रावणवाडी नागपूर दि.२9: ज्या समाजात आपण जन्मलो त्या समाजाचे ऋण फेडणे आपले कर्तव्य आहे. आजघडीला रक्ताची कमतरता भासत असल्याले अनेक रूग्ण रक्तासाठी भटकतात. रक्ताची गरज रक्तानेच पुर्ण करता येते. रक्तदान हेच श्रेष्ठदान आहे. कारण आपल्या रक्तदानातून आपण पुढच्या व्यक्तीचा जीव वाचवितो. रक्तदानात पुढाकार घेवून प्रत्येकाने हे महादान करायलाच पाहिजे, असे प्रतिपादन युवा स्वाभिमानचे जिल्हाध्यक्ष जितेश राणे यांनी केले.
रावणवाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून युवा स्वाभिमान शाखा रावणवाडीच्या वतीने सोमवार २८ नोव्हेंबर रोजी रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले. यावेळी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. प्रमुख अतिथी म्हणून शासकीय रक्तपेढीचे रक्तसंक्रमण अधिकारी डॉ.कांबळे, अनिल गोंडाणे, राजु रहांगडाले, उपसरपंच जियालाल उईके, शक्ती कटरे, यशवंत रहांगडाले आदि मान्यवर उपस्थित होते. महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पुजन झाल्यानंतर जितेश राणे यांनी स्वत: रक्तदान करून कार्यक्रमाचा शुभारंभ केला. यानंतर कार्यकर्त्यांनी रक्तदान केले. शिबिराच्या यशस्वीतेसाठी जिल्हा उपाध्यक्ष टोकेश हरिणखेडे, महासचिव जीवन शरणागत, श्याम बोपचे, सुनिल साठवणे, सुनिल कटरे, भिकू चौधरी, निलेश कटरे, संदीप येवले आदिंनी परिश्रम घेतले.





