लोकांच्या इच्छा-आकांक्षांच्या अभिव्यक्तीचे विधीमंडळ हे व्यासपीठ-विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे

0
7

नागपूर, दि. 14 : भारतीय लोकशाही ही जगातील सर्वाधिक मोठी लोकशाही मानली जाते. लोकांमधील सहिष्णूता हे आपल्या यशस्वी लोकशाहीचे गमक असून विधीमंडळ हे लोकांच्या इच्छा-आकांक्षांच्या अभिव्यक्तीचे महत्वपूर्ण व्यासपीठ आहे, असे प्रतिपादन विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी आज येथे केले.
राष्ट्रकुल संसदीय मंडळाच्या वतीने विधानभवनातील विधानपरिषद सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या संसदीय अभ्यासवर्गात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. या अभ्यासवर्गात राज्यातील 11 विद्यापीठांतील राज्यशास्त्र आणि लोकप्रशासन विषयाचे विद्यार्थी सहभागी झाले आहेत. याप्रसंगी विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, आमदार विनायक मेटे, विधानमंडळाचे प्रधान सचिव डॉ. अनंत कळसे आदी मान्यवर उपस्थित होते.
श्री. बागडे म्हणाले की, विधीमंडळाचे सदस्य हे लोकांमध्ये मिसळत असतात. लोकांमध्ये फिरुन ते त्यांच्या भावना जाणून घेतात. या भावना सरकारपर्यंत पोहोचविण्याची संधी त्यांना विधीमंडळाच्या अधिवेशनाच्या माध्यमातून मिळते. लोकांचे अनेक महत्वपूर्ण प्रश्न विधीमंडळाच्या अधिवेशनात मार्गी लागतात. त्यामुळे विधानमंडळ हे लोकांच्या इच्छा-आकांक्षांची पूर्तता करणारे महत्वाचे व्यासपीठ आहे, असे ते म्हणाले.
मागील आठवड्यापासून सुरु असलेल्या या अभ्यासवर्गाचा आज याप्रसंगी समारोप करण्यात आला. अभ्यासवर्गात सहभागी 11 विद्यापीठांतील विद्यार्थी व शिक्षकांना विधानपरिषदेचे सभापती श्री. नाईक-निंबाळकर व विधानसभा अध्यक्ष श्री. बागडे यांच्या हस्ते प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.
अवर सचिव सुनिल झोरे यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले. गोंडवाना विद्यापीठाचा विद्यार्थी प्रदिप ठाकरे याने आभार मानले.