महाधिवक्तापदी नागपूरचे रोहित देव

0
17

मुंबई,दि.28 : तब्बल नऊ महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर अखेर राज्याच्या महाधिवक्तापदी अ‍ॅड. रोहित देव यांची नियुक्ती करण्यात आली. देव यांच्या नियुक्तीची राज्यपालांकडे शिफारस करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.

देवेंद्र फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर नागपूरचे अ‍ॅड. श्रीहरी अणे यांची महाधिवक्तापदी नियुक्ती शासनाने केली होती. अणे यांनी राजीनामा दिल्यानंतर अ‍ॅड. शशांक मनोहर यांची महाधिवक्तापदी नियुक्ती झाली. तथापि, मनोहर यांनीही राजीनामा दिला. तेव्हापासून महाधिवक्तापद रिक्त होते. अ‍ॅड. देव हेही नागपूरचे असून सध्या ते कार्यकारी महाधिवक्ता म्हणून कार्यरत होते.

महाधिवक्ता पद तातडीने भरण्यात यावे,अशी याचिका काँग्रसचे विधान परिषद सदस्य संजय दत्त यांनी मुंबई उच्च न्यायालयात केली. त्यात, महाधिवक्त्याची नेमणूक ३० डिसेंबरपूर्वी केलीे जाईल, असे आश्वासन याचिकेवरील सुनावणीदरम्यान सरकारतर्फे गेल्या आठवड्यात देण्यात आले होते. त्यानुसार, आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत रोहित देव यांच्या नियुक्तीची शिफारस राज्यपालांकडे करण्याचा निर्णय घेण्यात आला.