वर्षाकाठी फक्त ५४ लाखाचे वार्षिक उत्पन्न, व्यवसायिक उड्डाणासाठी सज्ज असलेले विमानतळ,राजकीय द्वेषाचे बळी ठरतेय
खेमेंंद्र कटरे,गोंदिया,दि.24:- मध्यभारतातील सर्वात मोठे विमानतळ म्हणून बिरसी विमानतळाचे नाव आहे. परंतु या विमानतळाहून एकही व्यवसायिक उड्डाण होत नसल्याने कुठल्याही आर्थिक उत्पन्नाचे स्त्रोत नाही. त्यामुळे हा विमानतळ वर्षाकाठी ९ कोटीच्या तोटयात चालल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामुळे या विमानतळाच्या आर्थिक उत्पन्नात भर घालण्यासाठी व पूर्व विदर्भासह ,मध्यप्रदेश व छत्तीसगडच्या पर्यटन व्यवसायाला चालना देण्यासाठी या विमानतळावर व्यावसायिक उडाने सुरू केल्यास हे विमानतळ नफ्यात येवू शकते.त्यासाठी लागणारी सर्व यंत्रणा तयार असून २४ तासाच्या आत हे विमानतळ उड्डानासाठी उपलब्ध करून देण्याची तयारी बिरसी विमानतळाचे विमानपत्तन निदेशक सुभाष एस.प्रजापती यांनी बेरार टाईम्ससोब बोलतांन दाखविली.
बिरसी विमानतळाच्या विकासासंदर्भात माहिती देतांना ते म्हणाले की १२५७ एकर विस्तीर्ण जागेत हे विमानतळ असून देशात कुठल्याही विमानतळाची एवढी मोठी मालकी असलेली जागा नाही. सोबतच महाराष्ट्रातील महत्वाची मुख्य विमानतळे सोडल्यास ३२०० मीटर धावपट्टी असलेले असे हे एकमेव प्रशिक्षण विमानतळ आहे. या विमानतळावरून रायबरेली येथील इंदिरा गांधी पायलट प्रशिक्षण केंद्राचे प्रशिक्षणार्थी हे ५ महिन्यासाठी नोव्हेंबर ते मार्च या कालावधीत येथे येतात.त्यांच्या या काळात २७ लाख एवढे उत्पन्न मिळते. तर बिरसी विमानतळ हे कॅनेडियन कंपनीला पायलट प्रशिक्षणासाठी ५१ टक्के शेयर्स देवून उपलब्ध करून देण्यात आले आहे. या प्रशिक्षण संस्थेकडूनही २७ लाख वार्षिक भाडे मिळत आहे. असे एकूण ५४ लाख रुपयेच वर्षाचे या विमानतळाला उत्पन्न आहे. मात्र भारतीय विमानपत्तन प्राधिकरणाचे ५० अधिकारी-कर्मचारी ,पायलट प्रशिक्षण संस्थेचे १६ कर्मचारी-अधिकारी, एअर ट्राफिक कंट्रोलचे कर्मचारी-अधिकारी व विमानतळाच्या सुरक्षेसाठी २४ पोलिस कर्मचारी-अधिकारी सेवेत आहेत. यांचा सर्व वेतनाचाही आकडा आर्थिक उत्पन्नाच्या वर चालला आहे. सर्वात मोठे प्रशिक्षणार्थी विमानतळ असले तरी या विमानतळावर रडार यंत्रणेची व्यवस्था मात्र अद्यापही नाही.येथील एटीसी कक्षातून १६० ते ३६० किलोमीटर पर्यंंतचे विमानाचे नियंत्रण आणि संपर्क साधता येते.
या विमानतळाला आर्थिक उत्पन्न मिळवून देण्यासाठी राजकीय इच्छाशक्तीची सुध्दा गरज आहे.मध्यप्रदेश,छत्तीसगडसह पुर्व विदर्भासाठी हे महत्वाचे विमानतळ आहे.नक्षलग्रस्त भागाला लागून हे विमानतळ तर आहेच सोबतच या विमानतळाला लागूनच कान्हा केसरी व नागझिरा नवेगाव हे व्याघ्रप्रकल्प आहेत.त्यामुळे या विमानतळाचा वापर पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी व्यवसायिक उड्डाणाची गरज आहे.हैद्राबाद येथील सुप्रीमो कंपनीने बिरसी विमानतळावरुन खासगी उड्डाण सुरु करण्यासाठी प्रयत्न केले होते,पंरतु त्यांनी पाहणी केल्यानंतर काहीच पुढाकार घेतला नाही.तेव्हा शासनाने मध्यप्रदेश सरकारसोबत चर्चा करुन या विमानतळाचा व्यवसायिक लाभ कसा घेता येईल याचा विचार करायला हवे तसेच मोठ्याप्रमाणात कार्गोहब हे विमानतळ होऊ शकते असेही प्रजापती यांचे म्हणने आहे.
विमानतळाच्या मिळालेल्या जागेचे भूसंपादन करून त्या जमिनीचा मोबदला दिल्यावरही काही जमिनमालकांनी समाधानकारक मोबदला न मिळाल्याने न्यायालयात धाव घेतली आहे.त्या मोबदल्याची रक्कम विमान प्राधिकरणाने उच्चन्यायालयात जमा केल्याचेही त्यंनी सांगितले.त्यातच बिरसी ग्रामपंचायतीने ७० लाख रूपयांचे वार्षिक कर आकारल्याने हे प्रकरण जिल्हा प्रशासनाकडे आम्ही सोपविले आहे. बिरसी ग्रामपंचायतच्या सरपंचानी कर आकारणी न भरल्यास विमानतळाला कुलूप ठोकण्याचा दिलेला इशारा हा शासकीय यंत्रणेसाठी योग्य नसल्याचे सांगत जिल्हा प्रशासनाला योग्य कर आकारणी करुन देण्यासंदर्भांत पत्र व्यवहार केल्याचेही सांगितले.तर या विमानतळाच्या सुरक्षेसाठी qकवा इतर कामासाठी जे काही सुरक्षा कर्मचारी लागतात त्यासाठी ज्या कंपनीला कंत्राट मिळते त्यास ९० टक्के हे सेवानिवृत्त सैनिक व १० टक्के स्थानिक असे नेमून द्यावयाचे असतात.परंतु या विमानतळावर ९० टक्के स्थानिक व १० टक्केच सेवानिवृत्त सैनिक असल्याने सुरक्षेचा विषय महत्वाचा झाल्याचे सांगत कंपन्या कमी पैसात स्थानिकांना ठेवून शासकीय नियंमानाही बगल देत असल्याचे प्रजापती यांनी सांगितले.





