मंत्री जयकुमार रावल यांच्या उपस्थितीत मनरेगा योजनेची आढावा बैठक

0
19

मुंबई, दि.3 : रोहयो मंत्री जयकुमार रावल यांच्या प्रमुख उपस्थितीत दि.2 मंत्रालयात महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेचा आढावा घेण्यात आला.सिंचन विहिरींच्या कामांना गती देण्यात यावी. तसेच मजुरांना तातडीने रोजगार मिळण्याच्या दृष्टीने या प्रक्रियेत अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करण्यात यावा, असे निर्देश मंत्री श्री. रावल यांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
मंत्रालयात झालेल्या या बैठकीस रोहयो विभागाचे सचिव आबासाहेब जऱ्हाड,उपसचिव डॉ. प्रमोद शिंदे, मनरेगाचे सहआयुक्त शरद भगत, उदय पाटील आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.मनरेगा योजनेंतर्गत सध्या चालू असलेली कामे व पुढील कामांचे नियोजन याचे यावेळी सादरीकरण करण्यात आले.मनरेगा मधून १ लाख ११ हजार सिंचन विहीरी बांधण्याचे लक्ष्य निर्धारीत करण्यात आले आहे. यापैकी साधारण २० हजार विहीरींची बांधकामे पूर्ण झाली असून साधारण ६८ हजार विहीरींची कामे सुरु आहेत. यातून साधारण अडीच लाख एकर क्षेत्र सिंचनाखाली येऊ शकेल.मजुरांना कोणत्याही परिस्थितीत त्यांचे वेतन तातडीने मिळणे गरजेचे आहे.यासाठी या प्रक्रीयेत आयटी तथा इलेक्ट्रॉनिक्स तंत्राचा वापर करण्यात यावा. यासाठी आयटी विभागाच्या मदतीने तंत्रज्ञान विकसीत करण्यात यावे,असे निर्देशही मंत्री श्री. रावल यांनी यावेळी संबंधीत अधिकाऱ्यांना दिले.
यावेळी मनरेगा अंतर्गत सुरु असलेल्या कल्पवृक्ष फळबाग लागवड योजनेचाही आढावा घेण्यात आला.