मराठीजण ते मुख्यमंत्री सर्वच ‘मराठीचे मारेकरी’

0
6

पु. भा. भावे साहित्यनगरी, डोंबिवली, दि. 5 – मराठीच्या स्वरक्षणार्थ गळा काढणारी जी मंडळी आज आपल्या सभोवताल दिसतात त्यांना खरं तर मराठीशी काही घेणे-देणे नाही. प्रत्येक जण मराठीला आपल्या स्वार्थासाठी आपल्या सोयीनुसार भांडवल करीत असतो. यात सर्वसामान्य मराठी जणांपासून तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत सर्वांचा समावेश आहे. त्यामुळे हे सगळेच मराठीचे मारेकरी आहेत, असा संतप्त सूर रविवारी संमेलनात आयोजित ‘आम्हीच मराठीचे मारेकरी’ या परिसंवादात व्यक्त झाला. आनंद मिणसे यांच्या अध्यक्षतेत झालेल्या या परिसंवादात ज्येष्ठ पत्रकार ज्ञानेश महाराव, डॉ. अमृता इंदुरकर, प्रा. कृष्णा कुळकर्णी, डॉ. दीपक पवार, डॉ. कमलाकर कांबळे, अ‍ॅड. शांताराम दातार या वक्त्यांनी जागतिकीकरणाच्या झंझावातात मराठी कुठे असेल यावर गंभीर व अतिशय अभ्यासपूर्ण मते मांडली.