महावितरणला तंत्रज्ञानाच्या उत्कृष्ट वापरासाठी राष्ट्रीयस्तरावरील आयएसजीएफ पुरस्कार

0
8

मुंबई,दि.14:-महावितरणने आर-एपीडीआरपी भाग-अ अंतर्गत माहिती तंत्रज्ञानाचा उत्कृष्ट वापर करून ग्राहकांना तत्पर, ऑनलाईन आणि पारदर्शक सेवा उपलब्ध करून दिली असून वितरण हानी कमी करण्यातही मोठे यश मिळविले आहे. याची दखल घेत इंडिया स्मार्ट ग्रीड फोरमने महावितरणचा राष्ट्रीय पातळीवरील प्रथम क्रमांकाचा आयएसजीएफ इनोव्हेशन ऍ़वार्ड-2017 ने गौरव केला आहे. या ऍ़वार्डसाठी केंद्र सरकारचे माजी ऊर्जा सचिव श्री. पी. उमाशंकर, ऊर्जा मंत्रालयाचे सल्लागार अशोक झुनझुनवाला व पॉवर फायनान्स कार्पोरेशनचे माजी अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक एम.के. गोयल यांच्या निवड समितीने महावितरणची आयएसजीएफ ऍ़वार्डसाठी निवड केली. महावितरणच्यावतीने कार्यकारी संचालक श्री. शंकर शिंदे यांनी दिल्ली येथे नुकताच हा पुरस्कार स्वीकारला.आर-एपीडीआपी भाग-अ हा भारत सरकारच्या ऊर्जा मंत्रालयाचा महत्वाकांक्षी प्रकल्प असून देशातील सर्व राज्यात तो राबविण्यात आला आहे. यात देशभरातील विविध वितरण कंपन्यांपैकी सर्वात्कृष्ट कामगिरी करणाऱ्या महावितरणची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
आर-एपीडीआरपी भाग-अ चा उद्देश माहिती तंत्रज्ञानाच्या आधारे ग्राहकसेवेत सुधारणा करण्यासाठी परिणामकारक उपाययोजनांची अंमलबजावणे करणे असा आहे. महावितरणने त्यांतर्गत केलेल्या विविध प्रभावी उपाययोजनांमुळे राज्यातील 128 शहरे गो-लाईव्ह (ऑनलाईनने जोडलेली) जाहीर करण्यात आली आहेत. तसेच यामुळे राज्याच्या 80 टक्क्यांपेक्षा अधिक शहरातील वाणिज्यिक व वितरण हानी मोठ्या प्रमाणात कमी करण्यात यश आले आहे. यामुळे अधिकाधिक ग्राहकांना नवीन वीज जोडणी विद्युत नियामक आयोगाने निर्धारित केलेल्या मुदतीत देण्यात आली आहे. तसेच ग्राहकांच्या तक्रारी मोठ्या संख्येत निर्धारित मुदतीत सोडविण्यात यश येत आहे.
माहिती तंत्रज्ञानाच्या विविध ऍ़प्लीकेशन्समुळे महावितरणची ग्राहकसेवा, ऊर्जा अंकेक्षण, नवीन वीजजोडणी, वीज खंडित करणे, इत्यादी दैनंदिन कामे ऑनलाईन केली जात आहेत. वेबसेल्फ सर्व्हीस ऍ़प्लीकेशन्समुळे ऑनलाईन बीलपेमेंटची सुविधा ग्राहकांना उपलब्ध असून त्याचा ग्राहक मोठ्या प्रमाणात उपयोग करीत आहेत. गेल्या वर्षभरात राज्यातील ग्राहकांनी सुमारे 3 कोटीपेक्षा अधिक ऑनलाईन व्यवहार केले. त्याद्वारे ग्राहकांनी 4.9 कोटी रुपयांचा भरणा केला आहे. ग्राहकांच्या तक्रारी सोडविण्यासाठी भांडुप आणि पुणे येथे अत्याधुनिक ग्राहकसेवा केंद्र सुरू करण्यात आले असून त्याद्वारे दररोज सुमारे 10 हजारपेक्षा अधिक ग्राहकांच्या तक्रारी सोडविण्यात येतात. तसेच महावितरणच्या माहिती तंत्रज्ञान विभागाने ग्राहक आणि कर्मचाऱ्यांसाठी मोबाईल ऍ़प्स् तयार केले असून त्याद्वारे विविध सेवा ग्राहकांना ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या ऍ़प्सद्वारे कर्मचारी विविध दैनंदिन कामे ऑनलाईन पध्दतीने पार पाडीत आहेत. या सर्व उपक्रमांची दखल घेत महावितरणची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.यापुर्वी 2013 मध्ये महाराष्ट्र शासनाने आर-एपीडीआरपी भाग-अ च्या उत्कृष्ट अंमलबजावणीसाठी महावितरणचा ई-गव्हरनेस ऍ़वार्ड देऊन गौरव केला आहे. तसेच इंडियन एक्सप्रेस ग्रुपच्यावतीने 2016 चा एक्सप्रेस इंटिलेजेंट पीएसयु ऍ़वार्ड प्रदान करण्यात आला आहे.