दुष्कळ पडणार नाही, सरकार हमी देईल का? धनंजय मुंडे

0
17

मुंबई,दि.१७ :- कर्जमाफीनंतर शेतकरी आत्महत्या करणार नाहीत, याची हमी विरोधक देणार का? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या या प्रश्नाला आज (शुक्रवारी) विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी विधानपरिषदेत सडेतोड उत्तर दिले आहे.राज्यात दुष्काळ पडणार नाही, याची जबाबदारी सरकार घेत असेल, तर शेतकरी आत्महत्या करणार नाहीत, याची हमी विरोधक द्यायला तयार आहेत, असे धनंजय मुंडे यांनी सरकारला ठणकावून सांगितले आहे. मुंडे यांच्या या सडेतोड उत्तराने सरकारची चांगलीच कोंडी केली आहे.
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मागणीवरून नवव्या दिवशीही विरोधकांनी प्रचंड गदारोळ केला. परिणामी विधान परिषदेचे कामकाज दोनदा तहकूब करण्यात आले. मुख्यमंत्र्यांकडून शेतकर्‍यांची दिशाभूल केली जात आहे. शेतकरी कर्जमाफीची घोषणा होत नाही, तोवर सभागृह चालू देणार नाही, असा इशाराही मुंडे यांनी दिला आहे. मुख्यमंत्र्यांनी शेतकर्‍यांची दिशाभूल केली आहे. तसेच विधान परिषदेत निवेदन न करून वरिष्ठ सभागृहाचा अपमान करणार्‍या मुख्यमंत्र्यांनी सदस्यांची माफी मागवी, अशी मागणी ही मुंडे यांनी केली आहे.दरम्यान, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरुन महाराष्ट्राच्या राजकारणात दररोज नवनवीन घडामोडी घडताना दिसून येत आहेत. शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शिवसेनेच्या मंत्र्यांसोबत दिल्लीला रवाना झाले आहेत. यावेळी केंद्रीय अर्थमंत्री आणि कृषिमंत्री यांची भेट घेणार आहेत.दुसरीकडे, राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज मुंबई दौऱ्यावर आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज (शुक्रवार) राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची भेट घेणार आहेत.