शेती विकासाचा दर दोन वर्षांत उणे 11 वरून अधिक 12 टक्के

0
7

मुंबई दि.१८:- दोन वर्षांपूर्वी राज्याच्या कृषी आणि संलग्न क्षेत्राचा विकासदर उणे 11.2 टक्के होता. दोन वर्षांत तो नकारात्मकतेकडून सकारात्मकतेकडे आणण्यात शासनाला यश मिळाले असून, तो आता 12.5 टक्के इतका झाल्याची माहिती अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.
अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सन2016-17 चा आर्थिक पाहणी अहवाल विधानसभेत, तर अर्थ राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी विधान परिषदेत सादर केला. त्यानंतर आयोजित संयुक्त पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी अर्थराज्य मंत्री दीपक केसरकर, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव सुनील पोरवाल, अर्थ व सांख्यिकी संचालक प्र. दि. सोहळे आदी उपस्थित होते.
राज्य प्रगतीच्या वाटेवर गतीने वाटचाल करत असल्याचे सांगून मुनगंटीवार म्हणाले, की गेली दोन वर्षे राज्य दुष्काळाच्या छायेत असतानाही राज्याची अर्थव्यवस्था 2016-17 मध्ये 9. 4 टक्के दराने वाढेल, अशी अपेक्षा आहे. पुढच्या वर्षी राज्याचा विकासदर दोन अंकी करण्याचा शासनाचा प्रयत्न राहील, असे सांगून ते म्हणाले की, जगाच्या सर्व देशांचा सरासरी विकास दर हा 2.2 टक्के इतका आहे, भारताची अर्थव्यवस्था 7.1 टक्‍क्‍यांनी वाढणे अपेक्षित आहे. या सर्वांपेक्षा अधिक गतीने राज्य अर्थव्यवस्था विकसित होत आहे. राज्यात 2011 च्या जणगणनेनुसार चार कोटी 55 लाख रोजगार आहे. त्यापैकी 2 कोटी 60 लाख 500 रोजगार कृषी क्षेत्रात आहेत. राज्यात उद्योग आणि सेवा क्षेत्रात अनुक्रमे 6.7 टक्के आणि 10.8 टक्के वाढ अपेक्षित असल्याचेही ते म्हणाले.