लोकशाहीच्या मंदिरात ठोकशाही सुरु- मुंडे; निलंबनाला शिवसेनेचा विरोध

0
7

मुंबई .22 – सरकारने 19 आमदारांचे निलंबन करून लोकशाहीच्या मंदिरात ठोकशाही सुरु केल्याची जोरदार टीका विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे.अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान बॅनर फडकावणे, टाळ वाजवणे, घोषणाबाजी करणे, अध्यक्षांच्या सूचनांचे पालन न करणे, सभागृहाबाहेर अर्थसंकल्प जाळणे या प्रकरणी 19 आमदारांचे निलंबन करण्यात आले आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या दहा आणि काँग्रेसच्या नऊ आमदारांचा समावेश आहे.
विधानसभेतील काँग्रेस-राष्ट्रवादीच्या 19 आमदारांच्या निलंबनाला शिवसेनेने विरोध केला आहे. त्यासाठी शिवसेनेने मुख्यमंत्र्यांकडे धाव घेतली आहे. आमदारांचं निलंबन मागे घ्या अशी मागणी शिवसेनेने केली आहे.
निलंबनाची कारवाई रद्द करण्यासाच्या मागणीसाठी शिवसेना शिष्टमंडळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला गेले आहे. या शिष्टमंडळात परिवहन मंत्री दिवाकर रावते, उद्योग मंत्री सुभाष देसाई, पर्यावरण मंत्री रामदास कदम, आमदार सुनिल प्रभू, आमदार विजय अवटी, आमदार अनिल कदम यांचा समावेश आहे.शेतकरी कर्जमाफीच्या मुद्यावरुन आमदारांचे निलंबन चुकीचे असल्याचे शिवसेनेचे म्हणणं आहे.
या निलंबनानंतर मुंडे यांनी ट्विट करताना म्हटले आहे, की शेतकरी कर्जमाफीसाठी निलंबनच काय कोणतीही कारवाई झाली तरी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आपला आपला लढा सुरूच ठेवेल. लोकशाहीच्या मंदिरात लोकशाही नाही, तर ठोकशाही सुरु आहे. कर्जमाफीच्या मुद्द्यावर आमदार लढत असताना आमच्या आमदारांना निलंबित करण्यात आले.