19 आमदारांचे निलंबन मागे घेण्यास सरकार सकारात्मक

0
19

मुंबई, दि. 25 – विरोधी पक्षाच्या 19 आमदारांचे निलंबन रद्द करण्यासाठी सरकार सकारात्मक असल्याची सूत्रांची माहिती आहे. दोन टप्प्यात हे निलंबन रद्द करण्यात येऊ शकते. 29 मार्चला काही आमदारांचे निलंबन मागे घेण्यात येऊ शकते. राज्य विधानसभेत अर्थसंकल्पाचे वाचन सुरु असताना शेतक-यांच्या कर्जमाफीच्या मुद्यावरुन काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी सभागृहात गोंधळ घातला होता.
आमदारांचे निलंबन मागे घ्यावे यासाठी सरकारमध्ये सहभागी असलेली शिवसेना आग्रही होती. संसदीय कामकाज मंत्री गिरीश बापट यांनी मांडलेला आमदारांच्या निलंबनाचा प्रस्ताव आवाजी मतदानाने मंजूर करण्यात आला होता.
गेल्या तीन दिवसापासून निलंबमनाच्या मुद्द्यावरलविधानसभेच्या कामकाजावर विरोधकांनी बहिष्कार टाकला आहे. त्यामुळे, विरोधी पक्षातील १९ आमदारांचे निलंबन मागे घेण्याचे संकेत सरकाच्या वतीने आज (शनिवार) विधानसभेत देण्यात आले.सत्ताधारी व विरोधक ही एकाच रथाची दोन चाकं असून आमच्या सहकाऱ्यांना बाहेर ठेवण्यात आम्हालाही आनंद होत नसल्याचे निवेदन संसदीय कामकाज मंत्री गिरीश बापट यांनी विधानसभेत केले आहे.बापट म्हणाले, १९ आमदारांचे निलंबन शिस्त भंगाच्या कारणामुळे करण्यात आले होते. आता हे निलंबन मागे घेणारच नाही असे नाही, असे बापट यांनी स्पष्ट केले. लोकशाहीत विरोधी पक्षांचे आगळेवेगळे व महत्वाचे स्थान असून सत्ताधारी व विरोधक ही एकाच रथाची दोन चाेके असल्याचेही बापट यांनी सांगितले. गेले दोन दिवस कामकाजात विरोधक नाहीत याची आम्हाला सातत्याने जाणीव होत असल्याचे सांगत या मुद्द्यावर मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते, गटनेत्यांच्या अनेक बैठका झाल्या, यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केले असल्याचे बापट यांनी स्पष्ट केले. निलंबनाच्या मुद्द्यावर सरकारही सकारात्मकच असून अधिवेशन संपण्यास अजून काही दिवस बाकी आहेत. त्यामुळे कामकाजाच्या पुढच्या दिवशी, २९ रोजी मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते, सर्वपक्षीय गटनेते यांची बैठक घेऊन चर्चा करून मार्ग काढू असे आश्वासन बापट यांनी यावेळी बोलताना दिले.