गुंतवणूक वाढवून शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करू- मुख्यमंत्री फडणवीस

0
15

मूल येथे कर्मवीर मा.सा.कन्नमवार सभागृहाचे लोकार्पण
चंद्रपूर,दि.४:शेतकऱ्यांना शेती क्षेत्राशी निगडीत चांगल्या सुविधा उपलब्ध करून दिल्याशिवाय शेती फायद्यात येणार नाही. त्यामुळे कर्जमाफीऐवजी सिंचनासाठी पाणी, विजेची व वीज पंपांची उपलब्धता, मागेल त्याला विहीर, बाजारपेठ, हमी भाव, आधुनिक शेती तंत्रज्ञान पुरविण्यावर शासनाचा भर आहे. दोन वर्षात आम्ही कृषीचा विकास दर वाढवला आहे. पुढच्या चार वर्षात शेती क्षेत्रात भरीव गुंतवणूक करून शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करू, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
चंद्रपूर जिल्ह्यातील मूल येथे माजी मुख्यमंत्री मा.सा. कन्नमवार उपाख्य दादासाहेब कन्नमवार यांच्या पुतळ्याचे अनावरण, स्मारक आणि श्यामाप्रसाद मुखर्जी सार्वजनिक वाचनालयाच्या नवीन इमारतीचे लोकार्पण मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. मूल येथे मुख्यमंत्र्यांचे बालपण गेले आहे.
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कर्मवीर मा.सा.कन्नमवार यांच्या स्मारकासाठी विधीमंडळात लढा देणारे वित्तमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. व्यासपीठावर केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, आमदार सर्वश्री नाना श्यामकुळे, ॲड.संजय धोटे, मितेश भांगडिया, किर्तीकुमार भांगडिया, जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे, माजी मंत्री शोभाताई फडणवीस, संजय देवतळे, माजी आमदार जैनुद्दीन जव्हेरी, जिल्हाधिकारी आशुतोष सलील, मुख्य कार्यकारी अधिकारी एम.देवेंदर सिंह, नगराध्यक्षा रत्नमाला भोयर, माजी जि.प.अध्यक्षा संध्याताई गुरुनुले आदी उपस्थित होते.
यावेळी उपस्थित शेतकरी बांधवांना संबोधित करताना शासन शेतकऱ्यांसाठी नेमके काय करत आहे, याबाबतचा आढावाच मुख्यमंत्र्यांनी सादर केला. शेतकऱ्यांना केंद्रस्थानी मानून राज्यात विकास कामे केली जात आहेत. गेल्या दोन वर्षात शेती क्षेत्रात गुंतवणुकीचे प्रमाण वाढविण्यात आले आहे. गेल्यावर्षी अर्थसंकल्पामध्ये 31 हजार कोटीच्या भांडवली गुंतवणुकीपैकी 19 हजार कोटीची गुंतवणूक केवळ शेती क्षेत्रात करण्यात आली. त्यामुळे कृषी विकासाचा दर वाढला आहे. 26 हजार कोटीची सिंचन विकासाची कामे सुरू आहेत. शेतकऱ्यांना समृद्ध करायचे असेल तर केवळ कर्जमाफी न देता त्यांचे शेती क्षेत्रातील उत्पन्न दुप्पट करणे आवश्यक आहे. त्यावरच शासनाचा भर आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.
कर्जमाफीनंतर शेतकरी पुन्हा कर्जबाजारी होईल, अशी भिती व्यक्त करताना त्यांनी 2008 मध्ये कर्जमाफी दिल्यानंतर पुन्हा शेतकऱ्यांवर कर्जाचा बोजा वाढल्याचे सांगितले. त्यामुळे शेतकऱ्यांना कर्जमाफी करणे म्हणजे नवे कर्ज घेण्यास त्यांना पात्र ठरविणे असे होता कामा नये. जे गेल्या 15 वर्षात झाले त्यापेक्षा वेगळे आम्ही करीत आहोत. शेतकऱ्यांना उत्पन्नाची साधने दिल्यास ते आर्थिकदृष्ट्या सक्षम होतात, हे दोन वर्षातील आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. विदर्भातील शेतकऱ्यांच्या जीवनात बदल घडविण्यासाठी अपूर्ण राहिलेले अनेक प्रकल्प आम्ही विक्रमी वेळेत पूर्ण करण्याचे ठरविले असून गोसीखुर्द प्रकल्प 2019 पर्यंत पूर्ण करू असेही ते म्हणाले.
शेतकऱ्यांच्या जीवनात बदल करण्याचा संकल्प – सुधीर मुनगंटीवार
श्री. मुनगंटीवार यांनी यावेळी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या व जनसामान्यांच्या जीवनात विविध उपक्रम व योजनांमार्फत होत असलेल्या बदलाची माहिती दिली. चंद्रपूर जिल्ह्यात वन अकादमी, बांबू प्रशिक्षण केंद्र, व्याघ्र प्रकल्पातील प्रशिक्षण केंद्र, मोहा फुलावरील व अन्य वनसंपदेवरील प्रक्रिया उद्योग, कुक्कुट पालन, दुग्धव्यवसायाला गती, ताडोबा पर्यटन यामार्फत शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या संपन्न करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले. कन्नमवार यांच्या स्मारकाच्या निर्माणाची चित्रफित यावेळी दाखविण्यात आली. त्याचा उल्लेख करत या स्मारकात उभारण्यात आलेल्या 600 आसनाच्या प्रेक्षागृहामार्फत झाडीपट्टीतील नाट्यसंस्कृतीला संजीवनी मिळेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
चंद्रपूर जिल्हा विकासाचे मॉडेल- हंसराज अहीर
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार या दोघांच्या प्रयत्नातून चंद्रपूर हे विविध योजनांच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीने विकासाचे मॉडेल म्हणून पुढे येत असल्याचे श्री. अहीर यांनी सांगितले. या दोनही नेत्यांचे राज्यासोबतच केंद्रातही कार्य कौतूक होत आहे. इतर राज्यांचा तुलनेत राज्याचा जीडीपी जास्त आहे. राज्याच्या आर्थिक विकासाचे चांगले काम होत आहे. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल व केंद्रीय राखीव दलाची तुकडी चंद्रपूर येथे सुरू करण्यासाठी प्रयत्नशिल असल्याचे त्यांनी सांगितले.
जाहीर सभेच्यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी सार्वजनिक वाचनालयाच्या नवीन इमारतीचे उद्घाटन केले. त्यानंतर कर्मवीर मा.सा.कन्नमवार यांच्या पुतळ्याचे अनावरण व स्मारकाचे लोकार्पण केले. यावेळी त्यांनी कन्नमवार यांच्या कुटुंबियांचा सत्कार केला. या स्मारकामध्ये 8 कोटीचे अद्ययावत वातानुकुलीत नाट्यगृह साकारण्यात आले असून तेथे अत्याधुनिक सोई-सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत.