हवामानाची अचूक माहिती देणाऱ्या ‘महावेध’ प्रकल्पाचे  रविवारी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

0
17

मुंबई, दि. 29 : राज्यातील हवामानाचा अचूक अंदाज मिळण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने सुरु करण्यात येणाऱ्या ‘महावेध’ प्रकल्पाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज नागपूर येथे होणार आहे. ‘महावेध’ प्रकल्पाच्या माध्यमातून प्राप्त होणाऱ्या हवामान विषयक माहितीमध्ये अचूकता येणार असून त्याचा उपयोग पीक विमा योजना, हवामान आधारित पीक विमा योजना, कृषी हवामान सल्ला व मार्गदर्शन, कृषी संशोधन व आपत्ती व्यवस्थापनासाठी होणार आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून राज्यातील सर्व 2065 महसूल मंडळामध्ये स्वयंचलित हवामान केंद्राची उभारणी करण्यात येणार आहे. या प्रकल्पाचा शुभारंभ नागपूर जिल्ह्यातील डोंगरगाव या ठिकाणी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते होणार असून यावेळी कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर, ऊर्जा मंत्री तथा नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, कृषी राज्यमंत्री सदाशिव खोत, खासदार कृपाल तुमाने, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निशा सावरकर आदी उपस्थित राहणार आहेत.
कृषी हवामान क्षेत्रात आमूलाग्र बदल घडविणारा ‘महावेध’ हा राज्य शासनाचा महत्वाकांक्षी प्रकल्प असून या प्रकल्पांतर्गत सर्व महसूल मंडळांमध्ये स्वयंचलित हवामान केंद्रांच्या उभारणीसाठी राज्य शासन जागा उपलब्ध करुन देणार आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून प्रत्येक स्वयंचलित हवामान केंद्राद्वारे तापमान, पर्जन्यमान, सापेक्ष आर्द्रता, वाऱ्याचा वेग आणि दिशा या हवामान विषयक घटकाची अचूक व सद्य:स्थितीची (रिअल टाईम)माहिती दर 10 मिनीटांनी उपलब्ध होणार आहे. या माहितीचा उपयोग कृषी क्षेत्रातील विविध कामांसाठी होणार असून राज्यातील शेतकऱ्यांना शेतीच्या
कामासाठी त्याचा मोठा फायदा होणार आहे.
स्वयंचलित हवामान केंद्राच्या जाळ्यामुळे हवामानाच्या माहितीमध्ये अचूकता येणार असून  संशोधन व अव्यावसायिक स्वरुपाच्या सेवा देण्यासाठी हवामान घटकांच्या नोंदींची ही माहिती केंद्र अथवा राज्यशासनाच्या अखत्यारीत येणाऱ्या  संस्थांना / विद्यापीठांना संशोधन कार्यासाठी शासनमार्फत उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. सार्वजनिक खाजगी भागीदारीतून  बांधा-मालक व्हा – चालवा (Built-Own-Operate-BOO) तत्त्वावर हा प्रकल्प  राबविण्यात येणार आहे.