पर्यावरणावर महानिर्मितीतर्फे ५ जूनला नागपूर येथे आंतरराष्ट्रीय विज्ञान परिषद

0
8

नागपूर दि. 4 –: कोळशापासून वीज उत्पादन करताना जल,जमीन,समाज आणि पर्यावरणावर त्याचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष परिणाम होत असतो. मात्र शाश्वत पर्यावरण राहावे याकरिता पर्यावरण विषयक प्रश्न, समस्या, नवनवीन आव्हाने याबाबत या क्षेत्रातील तज्ञ मान्यवरांच्या विचारांचे आदान-प्रदान होणे तितकेच गरजेचे आहे. एकूणच पर्यावरण रक्षण या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन तसेच जागतिक पर्यावरण दिनानिमित्त  महानिर्मितीच्यावतीने ५ जूनला नागपूर येथे एक दिवसीय आंतरराष्ट्रीय विज्ञान परिषदेचे आयोजन करण्यात येत असून ह्यावर्षी आयोजनाची जबाबदारी महानिर्मितीच्या चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्राने स्वीकारली आहे.
नागपुरातील हॉटेल तुली इम्पिरियल येथे ५ जून रोजी सकाळी ९.३० वाजता या परिषदेचे उदघाटन नामदार चंद्रशेखर बावनकुळे, उर्जामंत्री महाराष्ट्र राज्य यांचे शुभहस्ते होणार असून “उद्योगात पाणी वापर,संवर्धन–पर्यावरण परिणाम” या विषयावर ख्यातनाम जलतज्ञ डॉ. राजेंद सिंग तर “कार्यक्षमता वाढ व स्थिरता” या विषयावर नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. विलास सपकाळ तसेच महानिर्मितीचे  संचालक(संचलन) चंद्रकांत थोटवे याप्रसंगी आपले विचार मांडणार आहेत.
“सांडपाण्यावर प्रक्रिया करून वीज उद्योगात वापर” यावर मुख्य अभियंता कोराडी वीज केंद्र  पंकज सपाटे मार्गदर्शन करणार असून परिषद आयोजनामागची भूमिका जयंत बोबडे, मुख्य अभियंता चंद्रपूर वीज केंद्र हे विषद करणार  आहे. दुसऱ्या सत्रात डॉ.साधना रायलू, डॉ.श्रीपाल सिंग,श्रीनिवास नागराजन,डॉ.सीमा श्रीवास्तव, डॉ.टी.डी.कोसे,डॉ.बागची, डॉ.आर.आर.खापेकर हे आपले मौलिक विचार मांडतील.
परिषदेच्या निमित्ताने पोस्टर स्पर्धा तसेच विद्यार्थी, संशोधक व व्यावसायिक यांचेकडून लघु शोध निबंध मागविण्यात आलेले आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने औष्णिक वीज केंद्रातील पर्यावरण विषयक प्रश्न,सांडपाणी प्रक्रिया व पुनर्वापर, घनकचरा व्यवस्थापन, हरित रसायन तंत्रज्ञान, पर्यावरणाचा समाजावर परिणाम, एफ.जी.डी. वापर, कुलिंग टॉवर व सांडपाणी प्रक्रियेत क्लोरिन ऐवजी ओझोनचा वापर इत्यादी पर्यावरणपूरक विषयांचा समावेश आहे. अधिक माहितीकरिता महानिर्मितीच्या www.mahagenco.in या संकेतस्थळावर पाहावे.
सन २०१५ मध्ये महानिर्मितीच्यावतीने नागपुरात पहिली पर्यावरण विषयक परिषद घेण्यात आली होती व आता दुसरी परिषद होत आहे. तज्ज्ञ मान्यवर, औद्योगिक प्रतिनिधी, पर्यावरण क्षेत्रात काम करणारी मंडळी, संशोधक, पर्यावरणवादी, व्यावसायिक, महानिर्मितीचे अधिकारी, केमिस्ट, निरी, प्रदूषण नियंत्रण मंडळ, केंद्रीय खनिकर्म व इंधन संशोधन इत्यादी संस्थांचे प्रतिनिधी या परिषदेत सहभागी होणार असल्याने याला विशेष महत्व प्राप्त झाले असल्याचे मुख्य अभियंता जयंत बोबडे यांनी सांगितले