नांदेड विभाग लवकरच मध्यरेल्वेला जोडला जाणार – सुरेश प्रभू

0
10

नांदेड,दि.05 :गेल्या अनेक वर्षांपासून नांदेड विभाग मध्य रेल्वेशी जोडण्यात यावा अशी मागणी केली जात आहे. मात्र या मागणीाला आता कुठेतरी पूर्णविराम मिळणार असून लवकरच नांदेड विभाग मध्यरेल्वेशी जोडण्यात येणार असल्याची माहिती रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी  औरंगाबाद येथे केली आहे.यामुळे गेल्या अनेक दशकापासून होत असलेली मागणी मराठी माणसांच्या नेतृत्वामुळे शक्‍य होत असल्याचे बोलल्या जात आहे. दक्षिण मध्य रेल्वेशी नांदेड विभाग जोडल्या गेल्या असून 90 टक्के क्षेत्र हे मराठी क्षेत्र आहे. केवळ 10 क्षेत्र तेलगू भाषिक आहे. यामुळे नांदेड विभागावर नेहमीच अन्याय केला जात आहे. गेल्या अनेक दशकापासून नांदेड विभाग दक्षिण मध्य रेल्वेतून काढून मध्यरेल्वेशी जोडण्यात यावा यामुळे रेल्वेमंत्र्यालयाकडून मिळणाऱ्या सुविधा व विभागाकडून मिळणाऱ्या सुविधा या अधिकच्या मिळू शकतील. विशेषत: दक्षिण मध्य रेल्वेकडून नांदेड विभागावर नेहमीच अन्याय केला जात आहे. मध्यरेल्वेशी हा विभाग जोडल्यानंतर या भागातील जनतेला अधिकच्या सुख सुविधेसह लांब पल्ल्याच्या गाड्याही उपलब्ध होऊ शकतील.

सध्या नांदेड विभागातून लांब पल्ल्याच्या गाड्या साप्ताहिक चालविल्या जातात. यामध्ये नांदेड सचखंड ही एकमेव गाडी सोडली तर इतर गाड्या साप्ताहिक अथवा दोन किंवा तीन दिवसाआड गाड्या चालविल्या जात असतात. विशेषत: प्रवाशांना चांगल्या दर्जेदार सुविधाही मिळत नाहीत. अशा तक्रारी नांदेड विभागातील प्रवाशांतून अनेकदा रेल्वे विभागाकडे केल्या आहेत. याबाबत औरंगाबाद येथील सुरेश प्रभू यांच्यासमोर हा प्रश्न उपस्थित केला असता त्यांनी तात्काळ हा प्रश्न सोडविण्यात येईल, नांदेड विभाग हा लवकरच मध्यरेल्वेशी जोडला जाणार असल्याचे ठोस आश्वासनही त्यांनी दिले आहे.

मराठवाड्यातील रेल्वेचा अनुशेष हा मोठ्या प्रमाणात आहे. येणाऱ्या काळात हा अनुशेष भरून काढण्याचे काम माझ्याकडून जास्तीतजास्त प्रयत्न केले जाणार असल्याचे आश्वासन प्रभू यांनी दिले. याचबरोबर नांदेड विभाग हा मध्यरेल्वेशी जोडल्यानंतर या भागातील नागरिकांना लांब पल्ल्याच्या गाड्यासह अधिक गाड्यांची सोय होऊ शकणार आहे व या भागातील रेल्वेच्या कामाला अधिकचा निधी येणाऱ्या काळात दिला जाणार असल्याचे मत त्यांनी औरंगाबाद येथे व्यक्त केले.