दिव्यांगांसाठी नागपुरात अत्याधुनिक केंद्र

0
12

नागपूर,दि.05-दिव्यांग व्यक्तींना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणत असताना त्यांच्यातील नेतृत्वाला वाव मिळावा, दिव्यांग स्वावलंबी व्हावेत तसेच त्यांचे पुनर्वसन व्हावे याकरिता सर्व सोयी – सुविधायुक्त अत्याधुनिक केंद्र उभारण्याची ग्वाही केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री थावरचंद गहलोत यांनी दिली.
दिव्यांग व्यक्तींच्या संमिर्श प्रादेशिक केंद्राचा भूमिपूजन सोहळा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय परिसरातील टीबी वार्ड येथे पार पडला. नागपूर शहरात दिव्यांगांकरिता राष्ट्रीय केंद्र सुरू करण्यात आले असून ही अत्यंत गौरवाची बाब आहे. केंद्र शासनाने २0१६मध्ये केंद्राला मान्यता दिली असून, त्यासाठी ३0 कोटी रुपये निधी उपलब्ध करून दिला असल्याचे गहलोत यांनी सांगितले. यावेळी केंद्रीय रस्ते व भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी, सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले, खासदार डॉ. विकास महात्मे, आमदार सुधाकर देशमुख, महानगरपालिका सत्तापक्ष नेता संदीप जोशी, सामाजिक न्याय विभागाच्या सहसचिव डॉ. डॉली चक्रवर्ती, राष्ट्रीय बहू विकलांग व्यक्ती अधिकारिता संस्थान चेन्नईचे हिमांशू दास, कंपोजिट रिजनल सेंटरचे संचालक डॉ. गुरबक्ष जगोटा उपस्थित होते.
याप्रसंगी दिव्यांग व्यक्तींच्या संमिर्श प्रादेशिक केंद्राच्या शिलान्यासाचे अनावरण करण्यात आले. दिव्यांग व्यक्तींच्या संमिर्श प्रादेशिक केंद्रात दिव्यांग बांधवांना स्वावलंबी बनविण्यासाठी प्रशिक्षण दिले जाईल. पुनर्वसनासाठी कंपोजिट रिजनल सेंटरचा आराखडा तयार करण्यात आला आहे. देशात सात राष्ट्रीय केंद्र कार्यरत आहेत. त्यानंतर आठवे केंद्र नागपुरात सुरू होत आहे. दिव्यांग व्यक्तींकरिता आवश्यक विकासाच्या संसाधनांची निर्मिती करणे, पायाभूत सेवा सुविधा पुरविणे हा केंद्राचा मुख्य उद्देश आहे.
नागपुरात साकारण्यात येणार्‍या केंद्रात पुनर्वसन चिकित्सा, व्यवसाय प्रशिक्षण, वाचा र्शवण आणि संभाषण विशेष शिक्षण, बधिर, अंधत्व व्यक्तींना प्रशिक्षण, शारीरिक आणि भौतिक उपचार, ज्ञानेंद्रिय उद्दीपन, प्रोस्थेटिक्स आणि ऑर्थोटिक्स, समुदाय आधारित पुनर्वसन, कृत्रिम अवयव आणि चलनवलन यंत्र, समुपदेशन व मार्गदर्शन करण्यात येणार आहे.