संत तुकाराम महाराजांची पालखी पुण्यनगरीत दाखल

0
17
पुणे,दि. 18-टाळ मृदुंगाचा गजर … माऊलीच्या नामाचा जयघोष… पंढरीच्या दिशेने पडणारी लाखो पाऊले… आकाशी फडकणा-या पताका… रस्त्याच्या दूतर्फा उभे असलेले भाविक… अशा मंगलमय वातावरणात श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचे आळंदीहून तर श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे देहूहून पुण्यात आगमन झाले. संत तुकाराम महाराजांची पालखी आज सायंकाळी 5 वाजता पुण्यात दाखल झाली. तुकारांमाचा जयघोष आणि विठ्ठलाचा नामस्मरणात पुण्यात दाखल झालेल्या तुकोबांच्या पालखीने पुण्य नगरी भक्तिमय झाली आहे. संत ज्ञानेश्वरांची अाळंदीहून निघालेली पालखीही पुण्यात दाखल झाली आहे.
प्रस्थानाच्या पहिल्या दिवशी माउलींच्या पालखीचा मुक्काम आळंदी येथेच आजोळघरी असतो. नगर प्रदक्षिणा करून पालखी पहिल्या मुक्कामासाठी आजोळघरी नेण्यात आली. आज (रविवारी) सकाळी माउलींचा पालखी सोहळा पुण्याकडे मार्गस्थ झाला.
संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज या दोन्ही संतांच्या पालख्या पुण्यात दोन दिवसांच्या मुक्कामासाठी थांबणार आहे. त्यानंतर मंगळवारी (20 जून) सकाळी दोन्ही पालख्या पंढरपूरकडे रवाना होतील. पुणे महापालिकेच्यावतीने या दोन्ही पालख्यांचे स्वागत महापौर मुक्ता टिळक, उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे,आमदार विजय काळे, प्रभाग समिती अध्यक्ष नगरसेवक विजय शेवाळे,नगरसेवक प्रकाश ढोरे, नगरसेविका स्वप्नाली सायकर,ज्योती कळमकर, सुनीता वाडेकर,अर्चना मुसळे, सहाय्यक आयुक्त संदीप कदम यांनी  केले. मुख्य पालखी मार्गाबरोबरच शहरातील भागात वारक-यांच्या गर्दीने रस्ते फुलून गेले. पुण्यातील विविध स्वयंसेवी संस्था व सर्व सामान्य नागरिकांडून वारक-यांना अन्न दानाचे व आवश्यक वस्तूंचे वाटप केले. लहान थोरांपासून ज्येष्ठ पुरूष व महिला दोन्ही पालख्यांमध्ये भक्तीभावाने सहभागी झाले. पालखी सोहळ्यातील तरुणाईचा सहभाग लक्षणीय होता. वारक-यांची सेवा करण्याबरोबरच तरुणाई पालखी मार्गावर सफाई करताना दिसत होती.