सेलूतील पंचायत समिती कार्यालयात साचले पाणी

0
12

वर्धा,दि.18- जिल्ह्यातील सेलू येथे शनिवारी झालेल्या मोठ्या पावसामुळे येथील पंचायत समितीच्या कार्यालयात पाणी साचले असून संगणक आणि कार्यालयातील महत्वाच्या दस्तऐवज पाण्यात भिजले आहेत.पंचायत समितीच्या कार्यालयाची इमारत चाळीस वर्षांपेक्षा जुनी आहे. ही इमारत संपूर्णत: मोडकळीस आलेली आहे. शनिवारच्या पावसाने इमारतीच्या छतावरील कवेलू फुटल्याने पाणी आत शिरले. शनिवारच्या पावसाने गटविकास अधिकाऱ्याचे कक्ष, पंचायत, आस्थापना विभाग आणि रेकॉर्ड रूममध्ये पाणी साचले. या कार्यालयांतील संगणक आणि महत्वाचे रेकॉर्ड पाण्यात भिजल्याची माहिती आहे. पावसाळ्याच्या पार्श्‍वभूमीवर इमारतीची डागडूजी करून छतावरील कवेलू काढून टिनपत्रे किंवा नवीन कवेलू टाकण्याकडे अधिकाऱ्यांनी लक्ष दिले नसल्यानेच अशी परिस्थिती निर्माण झाल्याचे दिसत आहे. इमारतीच्या छतावरील कवेलू फुटलेल्या अवस्थेत असल्याचे आढळून आले आहे. गेल्या पाच वर्षांपासून ही परिस्थिती असून तात्पुरती ताडपत्री टाकून वेळ निभावण्याचा प्रकार येथे सुरू आहे. यावर्षी मात्र अधिकाऱ्यांनी छतावर तापडत्री टाकण्याचे सौजन्यही दाखविले नाही.