बॅंकांनी शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा करण्यासाठी प्रयत्नशील राहणे आवश्यक – अर्जुन खोतकर

0
5

नांदेड,दि.20-बॅंकांनी शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा करण्यासाठी प्रयत्नशील राहणे आवश्यक आहे. त्यानुसार राज्य बॅंकेने शेतकऱ्यांना मदत करण्याची भुमिका घ्यावी , असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री अर्जुन खोतकर यांनी केले. येथील दि. महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बॅंकेच्या नांदेड शाखेचे उद्घाटन खोतकर यांच्या हस्ते आज झाले त्याप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी आ. हेमंत पाटील, आ.नागेश पाटील आष्टीकर, माजी आ. ओमप्रकाश पोकर्णा, बॅकेचे प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष डॉ. एम. एल. सुखदेवे, व्यवस्थापकीय संचालक प्रमोद कर्नाड, जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे उपाध्यक्ष डॉ. सुनिल कदम, गणपतराव तिडके, प्रशासकीय मंडळाचे सदस्य के. एन. तांबे, अशोक मगदूम यांची प्रमुख उपस्थिती होती. पालकमंत्री खोतकर पुढे म्हणाले की, बॅंकेने स्वत:बरोबर ठेवीदार, कर्जदार, लाभार्थीचे हित जपले पाहिजे. प्रक्रिया उद्योगाला पुढे आणण्यासाठी बॅंकांनी आर्थिक मदत करुन शेतीपुरक उद्योगाला चांगली गती दयावी. शेतकऱ्यांची मुले उद्योग उभारणीत पुढे येतील त्यासाठी बॅंकांद्वारे प्रयत्न करावेत. त्याद्वारे राज्य बॅंकेचे चांगले काम यातून घडू शकते. राज्य बॅंकेतील ठेवीदारांच्या ठेवीत वाढ होत आहे हे बॅंकेच्यादृष्टिने चांगले आहे. बॅंकेसाठी तारण महत्वाचे असून ज्या जिल्हा बॅंका बंद आहेत त्याबाबत राज्य शासनाने जिल्हा मध्यवर्तीच्या बाजुने भुमिका घेतली आहे. सहकारी बॅंकेला राज्य बॅंक ही जवळची असून राज्य बॅंकेला पुन्हा गतवैभव प्राप्त होत आहे, ही आनंदाची बाब असल्याचे खोतकर यांनी सांगितले.

आ.हेमंत पाटील म्हणाले की, शेती उद्योगांना आर्थिक आधार देण्याचे बॅंकेने काम केले आहे. प्रशासकीय मंडळ आल्यानंतर ठेवीदारांची खूप मोठी विश्वासर्हता वाढली आहे. त्यामुळे बॅंकेला नावलौकीक मिळला आहे. काळानुसार अत्याधुनिक सुविधा महत्वाच्या असल्याचे त्यांनी सांगितले. प्रास्ताविकात कर्नाड म्हणाले की, नांदेड येथील बॅंकेची 46 वी शाखा आहे. ही बॅंक राज्याची शिखर बॅंक म्हणून ओळखली जाते. शेती, सहकारी संस्थांना राज्य बॅंकेने प्रकल्प उभारण्यासाठी कर्ज पुरवठा केला आहे. जिल्हा बॅंकेला मदत करण्यासाठी प्रयत्न केला जाईल. बॅंकेतील अत्याधुनिक विविध सेवांचा लाभ घ्यावा, असेही त्यांनी सांगितले. सुरवातील मान्यवरांच्या हस्ते वसंतनगर येथील या शाखेचे फित कापून, दीप प्रज्वलन करुन उद्घाटन करण्यात आले. हॉटेल सिटी प्राईड येथे संपन्न झालेल्या समारंभात आमदार हेमंत पाटील यांनी गोदावरी अर्बन मल्टिस्टेट क्रेडिट को-ऑप. सोसायटीच्यावतीने 50 लाख रुपये ठेवीचा पहिला धनादेश दि महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बॅंकेच्या नांदेड शाखेत जमा केला.