वनमंत्र्यांच्या हस्ते “my plant”  मोबाईल ॲपचे उदघाटन  

0
10

वृक्ष लागवडीचे मिशन यशस्वी करा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे आवाहन

 

मुंबई दि. २२:   राज्यात  लोकसहभागातून १ जुलै ते ७ जुलै २०१७ या कालावधीत ४ कोटी वृक्ष लागवड करण्याचा वन विभागाचा संकल्प आहे. हे  मिशन सर्वांनी मिळून यशस्वी करा, माझ्या आपल्याला शुभेच्छा आहेत असे प्रतिपादन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. वनमंत्र्यांनी राज्यात वन विभागाने नियुक्त केलेल्या सर्व समन्वय अधिकाऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरंसिंगद्वारे संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. यावेळी वनसचिव विकास खारगे यांच्यासह वन विभागाचे इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यावेळी वनमंत्र्यांच्या  हस्ते “my plant ” या मोबाईल ॲपेचे उदघाटनही करण्यात आले.

वृक्ष लागवडीच्या सात दिवसांच्या कालावधीत रोपांची मागणी करणारे अनेक दूरध्वनी आपल्याला येतील.  प्रत्येकांनी त्याला संयमाने उत्तर द्यावे, वृक्ष कुठे व कशा पद्धतीने मिळू शकतील याची माहिती द्यावी अशा सूचना करून वनमंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले की, वृक्ष एका मोठ्या जागेत (ब्लॉकमध्ये) लावले तर ते जगवणे, त्याचे संगोपन करणे सोपे असते. परंतू  छोट्या आणि विखुरलेल्या जागेत लावल्या जाणाऱ्या,रस्त्याच्या दुतर्फा लावल्या जाणाऱ्या वृक्षांची काळजी घेणे, त्याला ट्रीगार्डची व्यवस्था करणे गरजेचे ठरते. याकडे ही सर्वांनी लक्ष द्यावे. काही उद्योजक, व्यापारी, बँका त्यांच्या सीएसआर निधीतून वृक्ष उपलब्ध करून देतात, ट्रीगार्ड पुरवतात त्यांच्याशीही सर्वांनी संपर्कात  राहावे,  रोप मागणाऱ्या प्रत्येकाला रोप मिळेल अशी व्यवस्था करावी. १ ते ७ जुलै या काळात वन विभागाच्या प्रत्येक अधिकारी आणि कर्मचाऱ्याला युद्धपातळीवर काम करायचे आहे. हे करतांना पुढच्या वर्षीसाठी माहिती बँक ही तयार करायची आहे. जाहिराती, संदेश, नावीन्यपूर्ण उपक्रम,स्वंयसेवी, सामाजिक, अध्यात्मिक संस्थांची डेटा बँक तयार करावयाची आहे. कारण २०१८ साली राज्यात आपल्याला १३ कोटी वृक्ष लागवडीचे आव्हान पूर्ण करायचे आहे, त्याची तयारी आतापासूनच सुरु करावयाची आहे. या डेटा बँकमुळे यावर्षी कोणत्या जिल्ह्याने कसे आणि काय काम केले, कोणत्या नावीन्यपूर्ण कल्पना राबविल्या हे आपल्याला कळेल आणि त्यातून आपल्याला अपूर्णांकातून पुर्णांकाकडे जाता येईल, असे ही वनमंत्र्यांनी यावेळी सांगितले.राज्यात ४ कोटी वृक्ष लागवडीची  तयारी पुर्ण झाली असून आतापर्यंत ४ कोटी ४१ लाख खड्डे खोदून झाले आहेत तसेच १६ कोटी पेक्षा अधिक रोप उपलब्ध आहेत अशी  माहिती वन सचिव विकास खारगे यांनी यावेळी दिली.  प्रत्येक विभागनिहाय दिलेले उद्दिष्ट आणि त्याची पुर्तता करतांना सेक्टरनिहाय वृक्ष लागवडीची माहिती स्वतंत्रपणे ठेवली जावी अशा सूचना त्यांनी यावेळी सर्वांना दिल्या यामध्ये रेल्वे, संरक्षण मंत्रालयाच्या जागेवर होणारी  तसेच कांदळवन क्षेत्रात होणाऱ्या वृक्ष लागवडीचा समावेश करावा असेही त्यांनी यावेळी सांगितले.