अटी, शर्थींशिवाय सरसकट कर्जमाफी : सदाभाऊ खोत

0
17
सांगली, दि. 22 – कोणत्याही अर्टी, शर्थींशिवाय व एकरांचे बंधन रद्द करून कर्जमाफी दिली जाणार आहे. त्याबाबत आदेश होऊन आॅक्टोबरपर्यंत प्रक्रिया पूर्ण केली जाईल, अशी माहिती कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी गुरुवारी येथे पत्रकारांशी बोलताना दिली.

कर्जमाफीच्या निर्णयाबद्दल ते म्हणाले की, बुधवारी रात्रीसुद्धा कर्जमाफीच्या निर्णयासंदर्भात पुन्हा मुख्यमंत्र्यांसमवेत आमची बैठक झाली. अटी व शर्थीही रद्द करण्याबाबत सरकारने निर्णय घेतला आहे. पाच एकरावरीलही सर्व थकबाकीदार कर्जदारांचाही योजनेत समावेश केला आहे.त्यामुळे आता कोणतीही अडचण यात राहिलेली नाही. २00८ मध्ये झालेली कर्जमाफी आणि आताच्या कर्जमाफीच्या निर्णयात खूप फरक आहे. त्यावेळची पाच एकराच्या आतील ३६ लाख ७९ हजार शेतकºयांना ६ हजार ९00 कोटीची कर्जमाफी दिली होती. आता जवळपास त्यात तिप्पट वाढ झाली आहे. जास्तीत जास्त शेतकºयांना आम्ही या योजनेत सामावून घेतले आहे.

केंद्रीय मंत्रिपदाच्या आशेने दुटप्पी राजकारण करण्याइतपत राजू शेट्टी छोटे नेते नाहीत. निरपेक्षपणे शेतक-यांसाठी काम करण्याची त्यांची पद्धत सर्वाधिक जवळून मी अनुभवली आहे. त्यामुळे त्यांच्यावरील ही टीका चुकीची आहे, असे मत कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी गुरुवारी पत्रकारांशी बोलताना केली.दोनच दिवसांपूर्वी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राजू शेट्टी यांना केंद्रीय मंत्रीपदाचे डोहाळे लागल्याची टीका केली होती. त्यास उत्तर देताना खोत म्हणाले की, मंत्रीपदाची नव्हे तर कोणत्याच पदाची अपेक्षा राजू शेट्टी यांनी कधीच ठेवली नाही.
ज्येष्ठ नेते प्रा. डॉ. एन. डी. पाटील माझ्याबद्दल काहीही बोलले तरी त्यावर मी प्रतिक्रिया देऊ शकत नाही. ते सामाजिक चळवळीतील भीष्माचार्य आहेत. त्यांच्याबद्दल मला नेहमीच आदर वाटतो, असे खोत म्हणाले. सदाभाऊ खोत सरकारधार्जिणे झाल्यामुळे त्यांची भाषा बदलली आहे, अशी टीका प्रा. डॉ. पाटील यांनी बुधवारी केली होती.