एसएमएस दाखविल्यास महावितरण वीजबील स्वीकारणार

0
11

मुंबई, दि. 03 ,-        वीज बिलाबाबत महावितरणच्यावतीने ग्राहकांना मोबाईलवर देण्यात आलेल्या एसएमएसच्या आधारावर वीजबील भरण्याची सुविधा महावितरणने राज्यभरातील ग्राहकांना उपलब्ध करून दिली असून त्याचा लाभ ग्राहकांना होणार आहे. महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. संजीव कुमार यांच्या निर्देशानुसार महावितरणने ही सुविधा ग्राहकांना उपलब्ध करून दिली आहे.
राज्यभरातील सुमारे 1 कोटी 39 लाख वीज ग्राहकांनी आपल्या मोबाईल क्रमांकाची नोंदणी महावितरणकडे केली आहे.  या ग्राहकांना महावितरणच्या वीजबिलाचा तपशील एसएमएसद्वारे संबंधित मोबाईलवर पाठविण्यात येतो. या एसएमएसमध्ये ग्राहक क्रमांक, वीज बिलाची रक्कम तसेच वीजबील भरण्याची अंतिम तारीख याचा समावेश असतो. राज्यभरातील अशा ग्राहकांना आता मोबाईलवरील एसएमएस दाखवून महावितरणच्या वीजबील भरणा केंद्रात वीजबील भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
ग्राहकांना जास्तीत जास्त सुविधा देण्याचा महावितरणचा प्रयत्न असून एसएमएसद्वारे ग्राहकांना अनेक सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत.  ग्राहकांनी महावितरणच्या कॉलसेंटर टोल फ्री क्र.
18002003435/18002333435/19120 येथे तसेच महावितरणचे मोबाईल ऍ़प अथवा महावितरणचे संकेतस्थळ www.mahadiscom.in येथे मोबाईल क्रमांकाची नोंदणी करावी, असे आवाहन महावितरणतर्फे करण्यात येत आहे.