गटसचिवांनी सभासद संख्या वाढवावी- सहकारमंत्री सुभाष देशमुख

0
13

मुबंई, ‍ दि. 5 : गटसचिवांनी हक्कासोबतच कर्तव्याची जाण ठेवावी.गावातील प्रत्येक शेतकरी हा मध्यवर्ती सहकारी बॅंकांशी जोडला गेला पाहिजे, खातेदार झाला पाहीजे. गटसचिव हा विकास संस्थांचा कणा आहे. या विकास संस्थातूनच महाराष्ट समृध्द होऊ शकतो. येणाऱ्या काळात सहकारी संस्था स्वत:च्या पायावर सक्षमपणे उभ्या करायच्या असतील तर गटसचिवांनी निष्ठेने काम केले पाहीजे. गटसचिवांच्या समस्या सोडविण्यासाठी शासन सकारात्मक असल्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी सांगीतले.
राज्यातील सुमारे सहा हजार 500 गटसचिवांच्या समस्यांविषयी आज सहकारमंत्र्यांच्या मंत्रालयातील दालनात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला सहकार विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव एस.एस.संधू, यासह कृती समीतीचे पदाधिकारी रविंद्र काळे, अर्जुन पाटील, के.डी.गव्हाणे, विश्वनाथ निकम उपस्थित होते.गटसचिवांच्या वेतनासाठी 6 सप्टेंबर 2014 चा शासन निर्णयात सुधारणा करण्यासाठीचा प्रस्ताव मान्यतेसाठी मुख्यमंत्र्यांकडे सादर केला असून त्यावर लवकरच सकारात्मक निर्णय होणार असल्याचे श्री. देशमुख यांनी सांगितले.
गटसचिवांच्या बदल्याबाबतचे अधिकार जिल्हा उप निबंधकांना देण्याबाबतही यावेळी चर्चा करण्यात आली. शासनाने नुकतीच छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना जाहीर केली आहे. या योजनेचा लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी गटसचिवांनी प्रभावीपणे काम करावे, असे आवाहन श्री. देशमुख यांनी केले.