मृद व जलसंधारण हा आदर्श विभाग होण्यासाठी प्रयत्न करणार- प्रा. राम शिंदे

0
18

मुंबई, दि. ५ : नव्याने तयार करण्यात आलेल्या मृद व जलसंधारण विभागात त्रुटी राहणार नाहीत यासाठी विभागात योग्य त्या सुधारणा करून एक आदर्श विभाग तयार व्हावा यासाठी प्रयत्न करणार असल्याचे मृद व जलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदे यांनी आज सांगितले.मृद व जलसंधारण आयुक्तालयाच्या स्थापनेसह विभागाच्या क्षेत्रीय यंत्रणेची
फेररचना करण्यासंदर्भात ३१ मे २०१७ रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आला होता. त्यानुसार कृषी विभागाकडील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमार्फत विकल्प भरून देण्याची कार्यवाही सुरू असून त्यावर विविध कृषी विभागातील संघटनांनी दिलेल्या निवेदनावर चर्चा करण्यासाठी सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक आयोजित केली होती.
बैठकीत बोलताना प्रा. शिंदे यांनी मृद व जलसंधारण विभागात फेरबदल करण्यासाठी कृषी विभागाशी संबंधित सर्व संघटनांनी आपले विकल्प १५ जुलैपर्यंत सादर करण्याच्या सूचना केल्या. सर्व संघटनांच्या प्रतिनिधींनी सुचविलेल्या सूचना ऐकून घेत प्रा. शिंदे यांनी सर्वांच्या सूचनांचा योग्य विचार करून नियमानुसार फेरबदल करण्यात येतील, असे सांगितले. मृद व जलसंधारण विभागाचा शासन आदेश निर्गमित करण्यापूर्वी देखील विविध संघटनांच्या सूचना विचारात घेऊनच सुधारणा करण्यात आल्या असल्याची माहिती मंत्री प्रा. शिंदे यांनी यावेळी दिली.