स्वच्छ,सुंदर आणि परिपूर्ण  शिर्डीसाठी सर्व सहकार्य-देवेंद्र फडणवीस

0
8

शिर्डी, दि. 8: श्री साई समाधी शताब्‍दी वर्षाच्या निमित्ताने शिर्डी येथे येणाऱ्या जगभरातील भाविकांसमोर शिर्डीचे स्वच्छ, सुंदर आणि परिपूर्ण रुप जावे यासाठी शासनातर्फे सर्व सहकार्य करण्यात येईल. तसेच शिर्डी विमानतळ येथे नाईट लँडींगची सुविधा निर्माण करून ते पुर्ण क्षमतेने सुरू करण्यात येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
केंद्र शासन  पुरस्कृत अटल अमृत अभियान वाढीव शिर्डी पाणी पुरवठा योजनेच्या भूमिपूजन समारंभप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री प्रा.राम शिंदे, पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, खा.सदाशिव लोखंडे, जि.प.अध्यक्षा शालिनीताई विखे-पाटील, श्री साईबाबा संस्थान विश्वस्थ व्यवस्थेचे अध्यक्ष सुरेश हावरे, विभागीय आयुक्त महेश झगडे, विशेष पोलीस महानिरीक्षक विनयकुमार चौबे, जिल्हाधिकारी अभय महाजन, श्री साईबाबा संस्थान विश्वस्थ व्यवस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रुबल अग्रवाल, डॉ़ सुजय विखे-पाटील नगराध्यक्षा योगिता शेळके आदी उपस्थित होते.
गुरु पुजनाच्या मुहुर्तावर शिर्डीत येण्याचा योग आल्याबद्दल आनंद व्यक्त्‍ करून श्री.फडणवीस म्हणाले, गावातून स्थलांतर होत असताना शहरे बकाल होत आहेत. तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी जगभरातून भावीक येतात. शिर्डी येथे शंभर देशातून भावीक येतात. त्यामुळे शहरे आणि विशेषत:   तीर्थक्षेत्रे स्वच्छ आणि सुंदर असावीत यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अटल अमृत योजनेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात निधी  उपलब्ध करून दिला आहे. या माध्यमातून भुयारी गटार, पिण्याचे पाणी, सांडपाणी व्यवस्थापन, हरितपट्ट्याची निर्मिती आदी कामे करण्यात येतील.शिर्डी येथील वाढीव पाणी पुरवठा योजना याच माध्यमातून करण्यात येत आहे. 2048 पर्यंतची शहराची लोकसंख्या लक्षात घेऊन ही योजना करण्यात येत  आहे. पुढील दीड वर्षात ही योजना पुर्ण करण्यात येणार असल्याने शहराला पुढील 30 वर्षे पाण्याची टंचाई भासणार नाही, असे त्यांनी सांगितले.
साईशताब्दी सोहळ्याच्या निमित्त्ताने शिर्डी शहराच्या विकासासाठी नगरपंचायतीतर्फे करण्यात आलेल्या सर्व मागण्यांबाबत सहकार्य करण्याची ग्वाही देऊन मुख्यमंत्री म्हणाले, शहरात सीसीटीव्ही, पथदिप, घनकचरा व्यवस्थापन आदी सुविधा उभारण्यात येणार आहे. शहर कचरा आणि धुळ विरहीत व्हावे यासाठी योग्य व्यवस्था उभारण्याची गरज आहे. कुंभमेळा यशस्वीपणे पार पाडल्यानंतर साईशताब्दी सोहळ्याचे वेगळेपण आणि सात्विकता भावीकांना दिसेल असा प्रयत्न करू, असे श्री.फडणवीस म्हणाले,
श्री.महाजन यांनी निळवंडे धरणाचे काम येत्या चार ते पाच वर्षात पुर्ण करण्यात येईल, अशी ग्वाही दिली. ते म्हणाले, 1970 मध्ये प्रकल्पाला प्रथम मान्यता मिळाली. या प्रकल्पाद्वारे केवळ अडीच हजार हेक्टर सिंचन क्षमता निर्माण झाली. शासनाने 2369 कोटींच्या खर्चाला सुधारीत मान्यता दिली आहे. त्यात 85 किमीचा डावा कालवा आणि 97 किमीचा उजवा कालवा तयार करण्यात येणार आहे. बंद पाईपलाईनद्वारे पाणी देण्यात येईल. प्रकल्प पुर्ण झाल्यावर 70 हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येईल, असे त्यांनी सांगितले.
पालकमंत्री शिंदे म्हणाले, केंद्र पुरस्कृत अटल अमृत योजना केवळ महानगरांसाठीच होती. मुख्यमंत्री महोदयांच्या प्रयत्नामुळे ती नगरपंचायतीसाठी लागू करण्यात आली. शहराच्या विकासासाठी शासनाने सकारात्मक दृष्टीकोनातून निर्णय घेतले आहेत. साई समाधी शताब्दी सोहळा जागतिक स्तराचा करण्यासाठी शासनातर्फे सर्व सहकार्य मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शेतकऱ्यांचे हित समोर ठेऊन कर्जमाफीचा महत्वाचा निर्णय घेण्यात आल्याचे ते म्हणाले.
तत्पूर्वी कोनशिला अनावरण करून शिर्डी येथील वाढीव पाणी पुरवठा येाजनेचे भूमीपुजन करण्यात आले. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पत्रकार प्रमोद आहेर यांनी लिहिलेल्या  ‘शिर्डी गॅझेटीअर’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.प्रास्ताविकात नगराध्यक्षा शेळके-पाटील यांनी पाणी पुरवठा योजनेसाठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल शासनाचे आभार व्यक्त करताना योजना पुर्ण झाल्यावर नगर पंचायत नागरिकांना पुर्ण क्षमतेने पाणी पुरवठा करू शकेल, असा  विश्वास व्यक्त केला.श्री.हावरे यांनी शिर्डी शहराच्या गरजा पुर्ण करण्यासाठी साईसंस्थान पुर्ण सहकार्य करेल, असे नमूद करू पाणी पुरवठा योजनेसाठी लोकवर्गणी रुपये 6 कोटी 58 लक्ष संस्थानतर्फे देण्यात आल्याची माहिती दिली.