प्रभारी कार्यकारी अभियंता तोटावाडचा कारभार; 14 कोटींचा निधी वाटप

0
8

नांदेड,दि.10- नांदेड सार्वजनिक बांधकाम विभागाचा कार्यकारी अभियंता पदाचा पदभार घेतलेल्या तोटावाडकडून सध्या मनमानी कारभार चालविला जात आहे.शासनाकडून थकीत कामाच्या बिलापोटी दोन हेड अंतर्गत 14 कोटी रुपयांचा मंजूर निधीचे वाटप प्रभारी कार्यकारी अभियंता तोटावाड यांनी एका रात्रीमध्ये मर्जीतील गुत्तेदारांना करुन मोकळे झाल्याने निधीची चौकशी करण्याची मागणी इतर गुत्तेदारतुन(कंत्राटदाराकडून)समोर आली आहे. 
नांदेड सार्वजनिक बांधकाम विभागाचा पदभार घेताच प्रभारी तोटावाड यांनी 25 जून रोजी प्राप्त झालेला निधी विशेषता: रविवार सुट्टी होती. तर दुसऱ्या दिवशी सोमवार ईदची सुट्टी होती. दोन दिवसाच्या सलग सुट्टीचा फायदा घेत प्रभारी अभियंता तोटावाड यांनी आपल्या मर्जीतील गुत्तेदारांना शासकीय विश्रामगृहावर रात्री बोलावून हेड क्रमांक 3 आणि 4 यातील 14 कोटीचा निधीचे वाटप अवघ्या काही मिनिटात वाटप करुन टाकले. विशेषता: काम झालेल्या बिलांसाठी शासनाने नांदेड सार्वजनिक बांधकाम विभागाकडे दिला होता. हा निधी शासनाच्या नवीन परिपत्रका- नुसार निधी वाटप करतांना श्रेष्ठतेनुसार निधी वाटप करण्याचा नियम असतांनाही तोटावाड यांनी मात्र या शासनाच्या नियमाला धाब्यावर बसवित आपल्या मर्जीतील गुत्तेदारांना हा निधी वाटप करुन आपली टक्केवारी त्यांनी मजबुत करुन घेतली. यामुळे नांदेड विभागाचे अधिक्षक अभियंता शेलार यांनी तोटावाड यांना नांदेडचा प्रभारी पदभार हा कामामध्ये अनियमितता असणाऱ्या कामाला परवानगी देण्यासाठी यांच्याकडे हा पदभार दिला का? अशी चर्चा होत असली तरी तोटावाड यांनी एकाच रात्रीत 14 कोटीचा निधी वाटप केलेल्या गुत्तेदारांची व कामांची यादी प्रसिध्द करावी अशी मागणी गुत्तेदारांतून आता समोर येत आहे.
केंद्र आणि राज्य शासन विशेषता:सार्वजनिक बांधकावर विशेष लक्ष देवून आहे. कारण या विभागाकडून होणारी प्रत्येक कामेही पारदर्शक व दर्जेदार स्वरुपाची झाली पाहिजेत यासाठी शासन अाग्रही भूमिका घेत आहे.त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाची या कामाची सखोल चौकशी होणे गरजेचे असून प्रभारी कार्यकारी अभियंता तोटावाड यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी ही पुढे येऊ लागली आहे.