केंद्र शासन सहकार्य करणार;उपसा सिंचन योजना सोलरवर

0
15

नागपूर,दि.16- राज्यातील एक हजार उपसा जलसिंचन योजना सोलर पार्कच्या माध्यमातून सौरऊर्जेवर आणण्यासाठी लागणारे सहकार्य केंद्र शासनतर्फे दिले जाणार आहे. या संदर्भातील प्रकल्प अहवाल तत्काळ सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. तसेच ऊर्जाक्षेत्रात सहकार्य वाढविण्यासाठी महावितरण आणि ईईएसएल यांच्यात महत्त्वपूर्ण सामंजस्य करारही यावेळी झाला. या प्रसंगी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे प्रामुख्याने उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानावर महाराष्ट्रातील ऊर्जाक्षेत्राशी संबंधित विविध उपक्रमांचा आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी आढावा घेतला. राज्यातील उपसा जलसिंचन योजनांना २४ तास वीजपुरवठा करण्याची मागणी आहे. तसेच सवलतीच्या दरात वीजपुरवठा व्हावा अशीही अपेक्षा असताना जास्तीत जास्त उपसा सिंचन योजना सौरऊर्जेवर आणल्या जाव्या.सौरऊर्जेवर या योजना आणल्या तर किमान १२ तास सौरऊर्जा या योजना उपलब्ध होणार आहे. त्यामुळे वीजबिलातही उपसा सिंचन योजनांना दिलासा मिळेल, याकडे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुख्यमंत्री व केंद्रीय मंत्र्यांचे लक्ष वेधले होते. ऊर्जाक्षेत्रात अधिक प्रगती आणि सहकार्य मिळावे म्हणून ईईएसएल या केंद्र शासनाच्या अखत्यारित असलेल्या संस्थेशी महावितरणचा सामंजस्य करार करण्यात आला. या कराराअंतर्गत ईईएसएलतर्फे एनर्जी इफिशिएन्सी पम्प पुरविण्यात येणार आहेत.सुरुवातीला हा प्रकल्प प्रायोगिक स्तरावर राबविण्यात येणार आहे.
राज्यात ग्रामीण भागात गावठाण व कृषी वाहिनीचे विलगीकरण झाले आहे, अशा ठिकाणी सौरऊर्जेद्वारे विद्युतीकरण करण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना महत्त्वपूर्ण ठरणार आहे.