असंघटीत कामगारासाठीच्या कल्याणकारी मंडळामध्ये वृत्तपत्र कामगारांचाही समावेश होणार-कामगारमंत्री

0
14

मुंबई, दि. 19 : केंद्र सरकारने असंघटीत कामगारांसाठी सामाजिक सुरक्षितता पुरविण्याच्या उद्देशाने दिनांक 31 डिसेंबर 2008 रोजी असंघटीत कामगार सामाजिक सुरक्षा अधिनियम 2008 पारीत केलेला असून दिनांक 16 मे 2009 रोजी पासून देशात या अधिनियमाची अंमलबजावणी सुरु झालेली आहे. त्यामुळे या अधिनियमाच्या कलम 14 अन्वये महाराष्ट्र शासनाने दिनांक 30 मे 2013 रोजी महाराष्ट्र असंघटीत कामगार सामाजिक सुरक्षा नियम 2013 पारीत केले असून दिनांक 30 मे 2013 रोजी पासून या नियमांची अंमलबजावणी राज्यात सुरु झालेली आहे. त्यामुळे असंघटीत कामगार सामाजिक सुरक्षा अधिनियम 2008 च्या कलम 6 अन्वये राज्यात लवकरच महाराष्ट्र राज्य सामाजिक सुरक्षा मंडळ स्थापना केली जाणार असून या मंडळामध्ये वृत्तपत्र कामगारांचाही समावेश होणार आहे, अशी माहिती राज्याचे कामगार मंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांनी दिली.
वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी स्वतंत्र कल्याणकारी मंडळ स्थापन करण्याच्या मागणीसंदर्भात आयोजित बैठक आज कामगार मंत्री संभाजी पाटील-निलंगेकर याच्या अध्यक्षतेखाली व उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत मंत्रालयामध्ये संपन्न झाली. या बैठकीस विकास आयुक्त (असंघटीत कामगार) पंकज कुमार, सहायक कामगार आयुक्त सुनीता म्हैसकर आदी उपस्थित होते.
असंघटीत कामगारासाठी नव्याने स्थापन करण्यात येणाऱ्या या मंडळाच्या माध्यमातून राज्यातील 3.65 कोटी असंघटीत कामगारांना विविध सामाजिक सुरक्षा व कल्याणकारी योजनांचा लाभ दिला जाणार आहे. यामध्ये विडी कामगार
ऊसतोड कामगार, बांधकाम मजूर, दगड खाणीतील कामगार, विणकर, यंत्रमाग कामगार, शेतकरी, मच्छीमार, शेतमजूर, कचरा गोळा करणारे कामगार, घर कामगार,रिक्षा ओढणारे कामगार, वर्तमानपत्र वाटप करणारे कामगार तसेच अगरबत्ती बनवणे, कृषी, कृषी अवजारे हाताळणे इत्यादी 122 उद्योग व व्यवसायातील असंघटीत कामगारांचा समावेश असणार आहे.