मातंग समाजाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी शासन सकारात्मक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
8

मुंबई,दि.2 : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सुमननगर
(चेंबूर) येथे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती कार्यक्रम
संपन्न झाला. यावेळी मातंग समाजाचे विविध प्रश्न मार्गी लावण्यासाठी शासन
सकारात्मक आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
या कार्यक्रमास आमदार भाई गीरकर, माधव भंडारी, अनिल ठाकूर, नगरसेवक
महादेव शिवगण, राजेश फुलवारीया आदी उपस्थित होते.
प्रारंभी मुख्यमंत्र्यांनी लोकशाहीर अण्णाभाऊंच्या पुतळ्यास पुष्पहार
अर्पण करून अभिवादन केले. मुख्यमंत्री याप्रसंगी म्हणाले, लोकशाहीर अण्णा
भाऊ साठेंनी त्यांच्या साहित्यातून, शाहिरीतून सामान्य माणसातील
स्फूल्लिंग, जागृत करण्याचे काम केले. ते दबलेल्या वर्गाचा, वंचितांचा
आवाज बनले. ते अल्पकाळ जगले असले तरी लोक त्यांना हजारो वर्षे आठवणीत
ठेवतील इतके मोठे काम केले आहे. अण्णा भाऊ साठे आणि लहुजी वस्ताद साळवे
ही व्यक्तीमत्त्वे सर्वच समाजासाठी आदर्श आहेत.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले, मातंग समाजाच्या समस्या सोडविण्यासाठी गेल्या
एक-दीड वर्षात प्रयत्न सुरू आहेत. शासनामार्फत लहुजी वस्ताद साळवे
यांच्या नावाने समिती स्थापन केली. या समितीच्या बैठकांमध्ये झालेले
निर्णय निश्चित कालावधीत लागू करण्यासाठी राज्य शासनाने दोन बैठका घेऊन
अनेक निर्णय मार्गी लावले. त्याचे शासन निर्णयही काढले. समितीचे उर्वरित
निर्णयही ठराविक कालावधीत मार्गी लावण्यासाठी शासन सकारात्मक आहे.
चिरागनागर येथे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या घराच्या ठिकाणी त्यांचे
स्मारक उभारण्यासाठी झालेल्या मागणीच्या अनुषंगाने, शासन या स्मारकाच्या
दृष्टीने सकारात्मक असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. लोकशाहीर अण्णा भाऊ
साठे महामंडळातील अनियमिततेमुळे कायदेशीर पेच निर्माण झाले होते ते जवळ
जवळ दूर करण्याचे काम झाले आहे. हे महामंडळ पुन्हा सुव्यवस्थित चालू
करण्यासाठी शासनाचे प्रयत्न सुरु आहेत. या महामंडळामुळे समाजातील
तरुणांना रोजगारासाठी निधी उपलब्ध होऊ शकेल. लहुजी वस्ताद साळवे यांच्या
संगमवाडी पुणे येथील स्मारकाबाबतही शासन सकारात्मक आहे, असेही
मुख्यमंत्री म्हणाले.