अडीच लाखाचे बक्षीस असलेल्या नक्षलवाद्याचे पोलिसांपुढे आत्मसमर्पण

0
8

गडचिरोली,दि.२६: मागील आठ वर्षांपासून नक्षल चळवळीत असलेल्या एका जहाल नक्षलवाद्याने नुकतेच गडचिरोली पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले आहे. गोमजी उर्फ अरसू चैतू जेट्टी असे आत्मसमर्पण करणाऱ्या नक्षल्याचे नाव आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोमजी उर्फ चैतू जेट्टी हा कंपनी क्रमांक १० चा सदस्य म्हणून कार्यरत होता. २००९ मध्ये तो गट्टा एलओएसमध्ये भरती झाला. त्यानंतर तो प्लाटून क्रमांक १९ चा सदस्य झाला. २०१० मध्ये त्याची कंपनी क्रमांक १० मध्ये बदली झाली. रेला, इंद्रावती जंगलातील चकमकी व अन्य गंभीर गुन्ह्यांमध्ये त्याचा सहभाग होता. त्याच्यावर पोलिसांनी सुमारे अडीच लाखांचे बक्षीस ठेवले होते.

२०१७ मध्ये आतापर्यंत एक कंपनी सदस्य, एक एरिया कमिटी सदस्यासह विविध दलमच्या १७ सदस्यांनी आत्मसमर्पण केले आहे. यामुळे नक्षल चळवळीला जबर हादरा बसल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. आत्मसमर्पितांसाठी पोलिस विभाग देत असलेले भूखंडा, आर्थिक मदत, रोजगाराची उपलब्धता, नसबंदी रिओपनिंग इत्यादींमुळे नक्षलवादी मोठ्या प्रमाणावर आत्मसमर्पण करीत आहेत. जे लोक नक्षल दलममध्ये सहभागी झाले आहेत, त्यांनी आत्मसमर्पण करुन मुख्य प्रवाहात सहभागी व्हावे, असे आवाहन पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी केले आहे.