शाळांमध्ये साजरा होणार स्वच्छ भारत पंधरवडा

0
30

स्वच्छ भारत मोहिमेअंतर्गत शालेय शिक्षण विभागाचा उपक्रम

मुंबई, दि. 28  : स्वच्छ भारत मोहिमेअंतर्गत शालेय शिक्षण विभाग राज्यातील शाळांमध्ये स्वच्छ भारत पंधरवडा साजरा करणार आहे. स्वच्छता हे काम नसून ती एक चांगली सवय आहे या भूमिकेतून 1 सप्टेंबर ते 15 सप्टेंबर 2017 या काळात स्वच्छ भारत पंधरवडा साजरा करण्यात येणार आहे.भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 2 ऑक्टोबर 2019 पर्यंत स्वच्छ भारत मोहिमेअंतर्गत स्वच्छ भारताचे ध्येय साध्य करण्याचे उद्दिष्ट ठरविले आहे. त्याचअनुषंगाने सप्टेंबर महिन्यातील 1 ते 15 हे दिवस स्वच्छ भारत पंधरवाडा साजरा होणार असून यानिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.

  • 1 सप्टेंबर 2017 रोजी सर्व शाळा आणि शिक्षण संस्थांमध्ये स्वच्छता शपथ घेतली जाणार असून यामध्ये विद्यार्थी, शिक्षक आणि कर्मचारी सहभागी होतील.
  • पंधरवाडयाच्या पहिल्या आठवडयात शाळा व्यवस्थापन समिती/ पालक शिक्षक संघ आणि शिक्षकांमध्ये बैठका आयोजित करुन मुलांमध्ये आणि शिक्षकांमध्ये स्वच्छता आणि स्वच्छतेचे महत्व अधोरेखित करणे, शाळा आणि घरांमध्ये स्वच्छता कशी असावी यासाठी मुलांना प्रोत्साहीत करणे.
  • शिक्षकांनी शाळेतील/शैक्षणिक संस्थेतील स्वच्छतेच्या सुविधांची तपासणी करावी तसेच आवश्यकता वाटल्यास सुविधांच्या देखभाल दुरुस्तीसाठी प्रस्ताव/योजना तयार करावी.
  • जिल्हा/तालुका/पंचायत स्तरावर स्वच्छ परिसर आणि व्यवस्थित शौचालयांसाठी स्पर्धांचे आयोजन करणे.
  • विद्यार्थी, शिक्षक आणि पालक यांच्यासाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन करणे
  • स्वच्छता विषयावर वादविवाद स्पर्धा आयोजित करणे.
  • स्वच्छतेच्या जागरुकतेविषयीचे संदेश शाळेच्या/शिक्षण संस्थेच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करणे, स्वच्छतेविषयीची छायाचित्रे शाळेमध्ये प्रकाशित करणे.

स्वच्छता पंधरवडयानिमित्त शाळा मुख्याध्यापक आणि शाळा व्यवस्थापनाने सुध्दा :

  • जुन्या अभिलेखांची नोंदणी करुन अनावश्यक असलेली कागदपत्रे काढून टाकावीत आणि नियमानुसार जुन्या फाईल्स आणि अभिलेख दप्तरी दाखल करावे.
  • शाळा परिसरातून सर्व प्रकारचे टाकाऊ सामान जसे मोडके फर्निचर, निरुपयोगी उपकरणे, नादुरुस्त वाहने नियमाप्रमाणे निर्लेखन करुन पूर्णत:काढून टाकावीत.
  • शिक्षक आणि विदयार्थी यांनी स्थानिक लोकप्रतिनिधींसह स्वच्छता पंधरवडयाचा प्रचार जवळील नागरी वस्तीत करावा.
  • ओला कचरा/सुका कचरा वेगवेगळा गोळा करण्याविषयी जागरुकता निर्माण करावी.

याशिवाय स्वच्छता पंधरवडयाला अधिक चालना आणि प्रोत्साहन मिळण्यासाठी

  • शाळा आणि परिसरात स्वच्छता राखण्याबाबत विदयार्थी/ कर्मचारी यांना प्रवृत्त करण्यासाठी दृकश्राव्य कार्यक्रमांचे आयोजन करणे.
  • शालेय शिक्षण विभागाच्या संकेतस्थळावर/वेब बेस पोर्टलवर स्वच्छ भारत पंधरवडयानिमित्त ई बॅनर तयार करुन अपलोड करावे, तसेच सोशल मिडीया, इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मिडीयामध्ये व्यापक प्रसिध्दी करणे.
  • स्वच्छ भारत पंधरवडयाच्या कालावधीत शाळा व्यवस्थापन समितीच्या बैठकीत स्वच्छता हा विषय कार्यक्रम पत्रिकेमध्ये समावेश करणे.
  • स्वच्छ भारत पंधरवडयाच्या कालावधीत दररोज सकाळी शाळांनी स्वच्छतेची शपथ घ्यावी.
  • शाळा आणि संस्थांनी स्वच्छता पंधरवडयामध्ये समाजाचा सहभाग वाढविण्याकरिता प्रयत्‍न करावेत.
  • स्वच्छ भारत यावरील गीतांचे प्रसारण करावे.
  • स्वच्छता पंधरवडयामध्ये विदयार्थी राजदूत नियुक्त करावेत.

स्वच्छ भारत मिशनचाच एक भाग म्हणून स्वच्छ भारत, स्वच्छ विदयालय हे मिशन संपूर्ण देशभरात सुरु आहे. राष्ट्रीय अभियानाला प्रतिसाद म्हणूनच महाराष्ट्रातही स्वच्छ विदयालय, स्वच्छ महाराष्ट्र हे अभियान सुरु करण्यात आले आहे.

स्वच्छ पंधरवडयानिमित्त विदयार्थ्यांमध्ये स्वच्छतेची उदिदष्टे पूर्ण होण आवश्यक आहे. जसे :

  • प्रत्येक मुलास हात धुण्याच्या 7 पायऱ्या शिकवून प्रत्येकवेळी त्याप्रमाणे हात धुण्याची सवय लागणे.
  • जेवणापूर्वी योग्य पध्दतीने हात धुण्याची सवय लावणे.
  • प्रत्येकवेळा शौचास जाऊन आल्यानंतर योग्य पध्दतीने हात धुण्याची सवय लावणे.
  • प्रत्येक मुलगा किंवा मुलगी यांना फक्त शौचालयात शौचास जाण्याची सवय लावणे.
  • प्रत्येक मुलास दररोज स्वच्छ आंघोळ करण्याची सवय लावणे.
  • प्रत्येक मुलांना केर-कचरा फक्त कचरा कुंडीत टाकण्याची सवय लावणे.
  • प्रत्येक मुलास स्वच्छ धुतलेले कपडे घालण्याची सवय लावणे.
  • प्रत्येक मुलाने आपला परिसर स्वच्छ ठेवण्याच्या दृष्टीने प्रयत्नशील राहून कार्य करणे
  • परिसर स्वच्छ ठेवताना तो सुंदर दिसेल याची काळजी घेणे.

स्वच्छता पंधरवडा निमित्ताने राबविण्यात येणारे उपक्रम केंद्र शासनाच्या शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाच्या शगुण पोर्टलवर अपलोड करण्यात यावेत अश्या सूचना शालेय शिक्षण विभागाने सर्व शाळा आणि शिक्षण संस्थांना दिले आहेत.