बँकांनी कर्जमाफीसाठीची माहिती 15 सप्टेंबरपर्यंत द्यावी

0
15

मुंबई, दि. 12 : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत 15 सप्टेंबर 2017 असून या मुदतीच्या आत सर्व शेतकऱ्यांनी अर्ज भरावेत. बँकांनी सुद्धा 15 सप्टेंबर 2017 पर्यंत कर्जमाफीसाठीची सर्व माहिती विहित नमुन्यात माहिती व तंत्रज्ञान विभागाला उपलब्ध करुन द्यावी, अशा सूचना मंत्रालयात सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली कर्जमाफीसाठी गठीत केलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत करण्यात आल्या.
आजपर्यंत 44 लाख 21 हजार 655 शेतकरी कुटुंबांचे अर्ज प्राप्त झाले आहेत.सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यांतील बँकांची बैठक घेऊन 15 सप्टेंबर 2017 पर्यंत कर्जमाफीसाठी लागणारी सर्व माहिती, माहिती व तंत्रज्ञान विभागाला देण्याच्या सूचना द्याव्यात. तसेच बँकांकडून संपूर्ण माहिती उपलब्ध झाल्यानंतर माहिती तंत्रज्ञान विभागाने तपासणी करावी. ही तपासणी पूर्ण झाल्यानंतर सदर योजनेचा लाभ मिळण्यास पात्र ठरतील अशा शेतकऱ्यांच्या कर्जखात्यात कर्जमाफीची रक्कम जमा करण्याची प्रक्रिया लवकरात लवकर सुरु
करण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आले. तसेच कर्जमाफीच्या प्रक्रियेला गती देण्यासाठी पालक सचिवांनी लक्ष द्यावे, अशा सूचनाही या बैठकीत देण्यात आल्या.
यावेळी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, वित्त मंत्री सुधीर मुनगंटीवार, कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर, परिवहन मंत्री दिवाकर रावते, जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, सहकार विभागाचे अपर मुख्य सचिव एस. एस. संधू, कृषी विभागाचे प्रधान सचिव विजय कुमार यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.