‘स्वच्छता हीच सेवा’ मोहिमेचा मुख्यमंत्र्यांचे हस्ते शुभारंभ

0
20

मुंबई, दि. 15 : स्वच्छ भारत अभियानांतर्गत बृहन्मुंबई महानगर आणि महाराष्ट्र शासन यांच्या विद्यमाने मुंबईतील महात्मा फुले मार्केट येथे ‘स्वच्छता हीच सेवा’ या मोहिमेचा औपचारिक शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज करण्यात आला.
मुख्यमंत्री यावेळी म्हणाले की, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गेल्या तीन वर्षात स्वच्छ भारताचा संदेश दिला आणि सर्व देश त्यांच्या पाठीशी उभा राहिला. स्वच्छतेसाठी शौचालयाची संख्या वाढवून एक प्रकारचे मोठे अभियान सुरू झाले. यातून घनकचरा व्यवस्थापनाची सुरूवात झाली. नगर विकास विभागाने घनकचऱ्याचे व्यवस्थापन उत्तम केले, असल्याचे
सांगुन मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या मोहिमेसाठी पंधरवडा जाहीर केला, त्याचा आजपासून औपचारिक प्रारंभ झाला आहे. ही मोहीम 2 ऑक्टोबर पर्यंत म्हणजे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीदिनापर्यंत चालणार आहे. या स्वच्छता अभियानाच्या निमित्ताने प्रत्येकाने कचरा न करायचा असे ठरवू आणि आपले शहर स्वच्छ करूया, असा संकल्प मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. पालकमंत्री सुभाष देसाई यांनी स्वच्छतेच्या बाबतीत देशात आपले मुंबई शहर क्रमांक एकचे व्हावे, अशा सदिच्छा व्यक्त केल्या.
याप्रसंगी मुंबई जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई, मुख्य सचिव सुमीत मल्लिक, नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर, मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त अजोय मेहता, आमदार राज पुरोहित, स्थानिक नगरसेवक, मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी-कर्मचारी, मार्केटचे पदाधिकारी, स्थानिक रहिवासी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.