शेतकऱ्यांना बांबू लागवडीसाठी कर्ज देण्याचा प्रयत्न-सुधीर मुनगंटीवार

0
22

मुंबई, दि. 25 : शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतातील उपलब्ध जागेवर बांबू उत्पादन घ्यावे, यासाठी नाबार्ड आणि स्टेट बँक ऑफ इंडिया यांच्याकडून शेतकऱ्यांना कर्ज मिळावे, यासाठी महाराष्ट्र बांबू विकास मंडळाने प्रयत्न सुरु केले असल्याची माहिती वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.बांबू  प्रजाती ही बहुउपयोगी असून शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतातील उपलब्ध
जागेवर बांबू लागवड केल्यास त्यांना अतिरिक्त लाभ मिळू शकतो, असे सांगून श्री. मुनगंटीवार म्हणाले की, याच कारणासाठी शासनाने बांबूला वन विभागाच्या वाहतूक परवान्यातून मुक्त केले आहे. यामुळे आदिवासी तसेच इतर युवकांनाही मोठ्या प्रमाणात रोजगाराची संधी उपलब्ध होऊ शकेल. उत्पन्न वाढीतून त्यांच्या जीवनमानात सुधारणा होऊ शकेल. यासाठी बांबू विकास मंडळ ही प्रयत्न करत असल्याचे त्यांनी सांगितले.
विदर्भातील एकूण 800 शेतकऱ्यांनी 1035 हेक्टर जमीन बांबू पिकासाठी वापरण्यास परवानगी दिली आहे. शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध झाले तर शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात बांबूची लागवड करता येईल. बांबू विकास मंडळ शेतकऱ्यांना बांबू लागवडीसाठी तांत्रिक मदत देखील करेल, असेही श्री. मुनगंटीवार यांनी सांगितले. शेतकऱ्यांना आर्थिक सुरक्षितता प्रदान करणारा बांबू नैसर्गिक प्रतिकूल परिस्थितीतही तग धरून राहतो. रत्नागिरी जिल्ह्यात दरवर्षी 3 हजार ट्रक मंगा बांबू प्रजातीची विक्री होते. बांबू विकास मंडळाने बंगलुरु, जबलपूर, रायपूर, येथील टीश्यू कल्चर रोपे मिळवण्यासाठी निविदा प्रक्रिया पूर्ण केली असून तेथील संस्थांनी रोपे पुरविण्याचे मान्य केले आहे. मंडळाने बांबूच्या बल्कोआ, ब्रारडीसी,नुतन्स, अस्पेर आणि तुलदा या पाच प्रजातींची लागवड करण्याचे ठरवले आहे, अशी माहितीही वनमंत्र्यांनी दिली.