महाराष्ट्राचा विकास दर 10 टक्के राखण्याचे लक्ष- मुख्यमंत्री

0
6

मुंबई- महाराष्ट्र हे देशाच्या विकासाचे इंजिन आहे. देशाचा 8 टक्के विकास दर गाठण्यासाठी राज्याचा विकास दर 10 टक्के निर्धारित केला असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दावोस येथे सांगितले. दावोस येथे सुरु असलेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम अंतर्गत आयोजित इंडिया इन्व्हेस्टमेंट राऊंड टेबल बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला केंद्रीय वित्त मंत्री अरूण जेटली, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू उपस्थित होते.

केंद्र सरकारने संरक्षण उत्पादन क्षेत्रात परकीय गुंतवणुकीला परवानगी दिली आहे. या पार्श्वभूमीवर संरक्षण उत्पादन क्षेत्रातील सॅफ्रान या कंपनीला नागपूर येथे गुंतवणूक करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी आमंत्रित केले आहे. नागूपर येथे भरपूर जमीन तर उपलब्ध आहेच, शिवाय बोईंग कंपनीचे देखभाल केंद्रही आहे. तसेच भारतीय वायुदलाच्या येथील देखभाल केंद्राच्याही बऱ्याच गरजा असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. नागपूर येथे जागा उपलब्ध करून देण्याची तयारी मुख्यमंत्र्यांनी दाखविली.

एकात्मिक कृषी विकासातंर्गत शासकीय तसेच खाजगी संस्था आणि शेतकऱ्यांच्या भागीदारीतून मुल्यावर्धीत साखळी निर्माण करण्यात येईल. शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाचा योग्य परतावा मिळावा यासाठी हे अभियान राबविले जाईल. 14 कृषी उत्पादनांसाठी असलेल्या या उपक्रमाचा 10 लाख शेतकऱ्यांना लाभ घेता येणार आहे. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या विषय पत्रिकेतील आंतरराष्ट्रीय अन्न सुरक्षा सत्रात बोलताना मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

जेपी मॉर्गनचे मुख्य कार्यकारी अधिकारी पिंटो यांच्याशीही मुख्यमंत्र्यांनी चर्चा केली. पिंटो यांनी भारतात कार्यविस्तार करण्याबरोबरच नोकरीच्या अधिक संधी उपलब्ध करण्याचे आश्वासन दिले. या संधी बँकींग सेवेचा विस्तार करून दिल्या जातील. मुंबईतही ही कंपनी आपला कार्यविस्तार करणार असून सध्या या कंपनीत 12 हजार लोक कार्यरत आहेत.

डीआजीओ कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी इव्हान मेजेंस यांच्याशी राज्यातील त्यांच्या उत्पादन विस्तार प्रकल्पाबाबत चर्चा झाली. या कंपनीचे राज्यात उत्पादन सुरु आहे. ज्या उत्पादनांना अधिक पाणी वापरावे लागेल, असे उद्योग मुबलक पाणी उपलब्ध असणाऱ्या ठिकाणी उभारावेत असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.