दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांना जामीन मंजूर

0
10

गडचिरोली,दि.27ः- देसाईगंज नगर पालिका निवडणुकीत निवडणूक निर्णय अधिकारी यांना निवडणूक चिन्हासंदर्भात फोनवरून दबाव आणल्याबाबतचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर दाखल झालेल्या गुन्ह्यात दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांना शुक्रवारी जामीन मंजूर करण्यात आला.
गडचिरोली जिल्ह्यातील सर्वांत पहिली नगर पालिका म्हणून ओळखल्या जाणाºया देसाईगंज नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणूकीदरम्यान दुग्धविकास मंत्री नामदार महादेव जानकर यांनी देसाईगंज येथील माजी नगराध्यक्ष जेसा मोटवानी यांच्या घरून देसाईगंज नगर पालिका निवडणूक निर्णय अधिकारी दामोदर नान्हे यांना फोन करून प्रभाग ९ ब मध्ये पंजा चिन्ह गोठवून कप बशी देण्याबाबत प्रकरणाचा व्हिडीओ संपूर्ण महाराष्ट्रात व्हायरल होऊन गाजला होता. याबाबत महाराष्ट्र निवडणूक आयोगाने दखल घेऊन प्रभाग ९ ब ची निवडणूक रद्द ठरवून निवडणूक आयोग महाराष्ट्र यांच्या आदेशानुसार नामदार महादेव जानकर व देसाईगंज येथील जेसा मोटवानी यांच्या विरूद्ध लोकसेवकाला त्यांच्या कायदेशीर कृत्य करताना त्याच्यावर दबाव आणल्याने भादंवि १६६ तसेच भादंवि १८६ नुसार कायदेशीर कर्तव्य पार पाडत असताना अडथळा निर्माण करणे तसेच महाराष्ट्र नगर परिषद, नगर पंचायत व औधोगिक नगरी अधिनियम १९६५ चे कलम २२(६) नुसार गुन्हा दाखल करण्यात केला होता. याबाबत दुग्धविकास मंत्री महादेव जानकर शुक्रवारी सकाळी ११.३० वाजता देसाईगंज येथील न्यायालयात न्यायाधीश के. आर. सिंघेल यांच्या समोर हजेरी लावली. त्यांना १५ हजार रु पयाच्या जमानतीवर जमानत मंजूर करण्यात आली.