धनगर आरक्षण अहवाल अंतिम टप्प्यात-मुख्यमंत्री

0
26

नागपूर,दि.06ः- राज्यातील धनगर समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात टाटा समाज विज्ञान या संस्थेचा अहवाल लवकरच प्राप्त होणार आहे. संवैधानिक बाबींची पूर्तता करणारा वस्तुनिष्ठ अहवाल ‘टीस’ने तयार केला असून अहवाल प्राप्त होताच तात्काळ अहवालाची छाननी करुन केंद्राकडे धनगर आरक्षणाची शिफारस राज्य शासन करेल, असे आश्‍वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. दरम्यान, सोलापूर विद्यापीठाला पुण्योक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
धनगर समाजाच्या वतीने आयोजित धनगर आरक्षण निर्णायक मेळाव्यात ते बोलत होते. केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, जलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदे, पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर, खासदार विकास महात्मे, आमदार तानाजी मुटकुळे, नारायण कुचे व धनगर समाजाचे विविध भागातील नेते यावेळी उपस्थित होते. मुख्यमंत्री म्हणाले, कुठल्याही समाजाला आरक्षण देण्यासाठी वस्तुनिष्ठ अहवाल केंद्र सरकारकडे पाठवणे बंधनकारक आहे. संविधानच्या तरतुदीत बसणारा हा अहवाल तयार करण्यासाठी राज्य शासनाने ‘टीस’ या संस्थेची नियुक्ती केली होती. या संस्थेने धनगर समाजातील नेत्यांनी व सामाजिक कार्यकर्त्यांनी सादर केलेली प्रत्येक निवेदन स्वीकारले. वीसपेक्षा जास्त जिल्ह्यात प्रत्यक्ष जावून तसेच लाखो लोकांशी भेटून तथ्य संकलन केले. या सोबतच आठ राज्यांना भेटी देऊन माहिती गोळा केली. धनगर समाजाचे वास्तव्य असलेल्या घरांना भेटी दिल्या आणि अहवाल तयार केला. हा अहवाल धनगर समाजाबाबतचा ऐतिहासिक दस्ताऐवज राहणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

धनगर समाजाची आरक्षणाची मागणी नवीन नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सबका साथ सबका विकास, अशी ग्वाही दिली आहे. त्यानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महादेव जानकर यांना मंत्रिमंडळात संधी दिली. आरक्षणाची मागणी पूर्ण करताना तांत्रिक अडचणींचा विचार करावा लागेल. आरक्षणासाठी राज्य सरकार प्रामाणिकपणे काम करीत आहे. आरक्षणासोबतच अन्य मार्गानेही उन्नती शक्य असल्याचे केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहिर यांनी सांगितले.
मेळाव्याचे संयोजक डॉ. विकास महात्मे म्हणाले की, आरक्षणाचे शिफारस पत्र केंद्राकडे पाठविणारे देवेंद्र फडणवीस हे गेल्या ७० वर्षातील पहिले मुख्यमंत्री ठरणार आहेत. महाराष्ट्र शासन या बाबतीत अतिशय योग्य कार्यवाही करत असून धनगर समाजाच्या बाजूने निर्णय घेतला जाईल अशी खात्री त्यांनी व्यक्त केली. मुख्यमंत्री हे धनगर आरक्षणासंबंधी सकारात्मक व प्रामाणिक असून टीसचा अहवाल प्राप्त होताच केंद्राकडे ते तातडीने शिफारस करतील. असा विश्वास महात्मे यांनी व्यक्त केला. यासोबतच वसतिगृह, शिष्यवृत्ती, भटक्या विमुक्तासाठी स्पर्धा परीक्षा विशेष प्रशिक्षण संस्था, शेफर्ड कमिशनची स्थापना, मेंढपाळचे प्रश्न आदी मागण्या त्यांनी यावेळी केल्या.गेल्या ७० वर्षांत धनगर समाजाची फसवणूक झाली. सत्तेसाठी आश्वासन देतात व नंतर विसरून जातात. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत धनगर समाजामुळे मुख्यमंत्री झाल्याची कबुली दिली. आरक्षणाबाबतही ते गंभीर आहेत. आता अरक्षण मिळाले नाही तर भविष्यात कधीच मिळणार नाही, अशी भूमिका जलसंधारण मंत्री राम शिंदे यांनी मांडली. संचालन डॉ. सुनिता महात्मे यांनी केले तर उपस्थितांचे आभार सुभाष लिंगाटे यांनी मानले. या कार्यक्रमास राज्यभरातील धनगर समाज बांधव मोठ्यासंख्येने उपस्थित होते.