दारूला महिलेचे नाव देण्याचा सल्ला; गिरीश महाजन यांच्‍याविरोधात संताप

0
10
जळगाव,दि.06-‘साखर कारखान्यात उत्पादित हाेणाऱ्या दारूच्या ब्रँडला महिलेचे नाव दिल्यास त्याचा अधिक खप होईल,’ असे वादग्रस्त वक्तव्य नंदुरबार जिल्ह्यातील कार्यक्रमात करणारे राज्याचे जलसंपदामंत्री तथा भाजपचे ज्येष्ठ नेते गिरीश महाजन चांगलेच वादात सापडले अाहेत.शहादा येथे सातपुडा साखर कारखान्याच्या गाळप हंगाम शुभारंभ कार्यक्रमात चेअरमन दीपक पाटील यांनी अापल्या कारखान्यात डिस्ट्रिलरी प्रकल्प अाहे, मात्र मद्याची विक्री कमी होते, असे सांगितले हाेते. त्यावर महाजन म्हणाले, ‘राज्यात सर्वाधिक देशी दारूची विक्री काेपरगावातील शंकरराव काळे यांच्या कारखान्यातून होते. त्यांनी दारूचे नाव ‘भिंगरी’ ठेवले आहे. तर माजी आमदार कोल्हे यांच्या कारखान्यात उत्पादित मद्याचे नाव ‘ज्यूली’ आहे. बाजारात ज्या उत्पादनांना महिलेचे नाव दिले जाते त्याची विक्री अधिक हाेते. त्यामुळे सातपुडा कारखान्याने मद्य विक्री वाढवण्यासाठी ‘महाराजा’ ऐवजी ‘महाराणी’असे नाव ब्रँडला द्यावे,’ असा सल्ला महाजनांनी दिला त्यावर उपस्थितांत हशा पिकला हाेता.
 राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी रविवारी त्यांच्याविराेधात मुंबई, जळगावात अांदाेलन केले. जळगावात महाजनांच्याच कार्यक्रमात जाऊन महिला कार्यकर्त्यांनी महाजनांचे नाव असलेल्या प्रतिमेवर दारूच्या बाटल्या फाेडल्या. तसेच त्यांच्या प्रतिमेला चपलांनी बदडून महिलांनी निषेध व्यक्त केला.
रविवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला अाघाडीने थेट महाजन यांच्या संपर्क कार्यालयात जाऊन दारूच्या बाटल्या फाेडल्या. या बाटल्यांवर गिरीश महाजन यांचे फाेटाे लावण्यात अाले हाेते. दारूचा ‘गिरीश महाजन टँगाे’ हा ब्रँड जाहीर करून महिलांनी साेबत अाणलेल्या महाजनांच्या फ्लेक्सबाेर्डला चपलांनी बदडले. महाजन यांनी महिलांची माफी मागावी, अन्यथा त्यांना जळगाव जिल्हाबंदी करू, असा इशाराही जिल्हाध्यक्षा कल्पना पाटील व इतरांनी यांनी दिला.