मौखिक आरोग्य तपासणी मोहिम अधिक प्रभावीपणे राबवा-आरोग्य मंत्री दिपक सावंत

0
15

  नागपूर‍ दि.11 : मौखिक कर्करोगाचा वेळेत प्रतिबंध व्हावा व योग्य उपचार व्हावे, यासाठी राज्यात मौखिक आरोग्य तपासणी मोहिम सुरु आहे. राज्यात नागपूर, अकोला, वाशिम, हिंगोली, भंडारा तसेच जळगाव या जिल्हयांमध्ये या मोहिमेअंतर्गत सर्वाधिक रूग्णांची तपासणी करण्यात हे जिल्हे पुढे आहेत. उर्वरित जिल्हयांनी देखील या मोहिमेला अधिक व्यापक आणि यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करावे, असे आवाहन आरोग्य मंत्री दिपक सावंत यांनी केले.

  आरोग्य उपसंचालक, माता कचेरी येथील सभा कक्षात आज आरोग्य मंत्री दिपक सावंत यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगव्दारे  मौखिक आरोग्य तपासणी मोहिमेचा संबंधित आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून आढावा घेतला. या वेळी अतिरिक्त संचालक ( मानसिक आरोग्य व संसर्गजन्य रोगश्रीमती साधना तायडे, अतिरिक्त संचालक (कुटुंब कल्याण) श्रीमती अर्चना पाटील, नागपूर आरोग्य विभागाचे उपसंचालक संजय जयस्वाल तसेच आरोग्य विभागाचे संबंधीत पदाधिकारी उपस्थित होते.यावेळी उपस्थित वैद्यकीय अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करतांना आरोग्य मंत्री दिपक सावंत यांनी या योजनेच्या अमंलबजावणीमध्ये मागे असलेल्या जिल्हयांनी क्षेत्रीय भेटीवर भर दयावा,   जनसंपर्काच्या माध्यमातून ही योजना जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहचविण्यासाठी प्रयत्न करावे. कारण तंबाखू आणि इतर व्यसनांमुळे समाजामध्ये आज मुख कर्करोगाच्या रूग्णांमध्ये लक्षणिय वाढ होत आहे. यासाठी मौखिक आरोग्य तपासणी मोहिम प्रभावीपणे राबवा, अशा सूचना त्यांनी यावेळी केल्यात. राज्यात हे अभियान प्रभावीपणे राबविण्यात येणार असून लोकांनीही या मोहीमेत सहभागी होऊन मौखिक तपासणी करुन घ्यावीअसे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

            राज्यात आशा कार्यकर्ती आणि एएनएम यांच्या माध्यमातून ग्रामीण भागात नागरिकांपर्यंत जाऊन या मोहिमेसंदर्भात जाणीव जागृती केली जात आहे आणि त्यांची मौखिक आरोग्य तपासणी केली जात आहे. जनजागृतीमुळे राज्यभरातील जिल्हा रुग्णालयप्राथमिक आरोग्य केंद्र तसेच सामान्य रुग्णालय  येथे  नागरिक स्वत: येऊन आरोग्य तपासणी करुन घेत आहेत. राज्य शासनाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या या मोहिमेचा शुभारंभ दि. डिसेंबर रोजी मुंबईतील मालवणी शासकीय रुग्णालयात आरोग्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला होता. या मोहिमे अंतर्गत राज्यातील 30 वर्षावरील स्त्री व पुरुषांची मौखिक तपासणी केली जात आहे. ही तपासणी सर्व शासकीयमहापालिका,नगरपालिका दवाखाने येथे मोफत उपलब्ध आहे. तसेच गाव पातळीवर ही तपासणी एएनएम व एमपीडब्लू यांच्यामार्फत करुन गरजू लोकांना पुढील उपचारासाठी नजीकच्या दवाखान्यात पाठविण्यात येणार आहे. यामध्ये उपचार हे पूर्णत: नि:शुल्क असणार आहेत.

           मिशन इंद्रधनुष ही राज्यशासनाची लसीकरणाची महत्वाकांक्षी योजना आहे. राज्यात सध्या काही ठराविक जिल्हयात ही योजना राबविल्या जात आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री जे.पी.लढ्ढा यांनी दोन दिवसांपूर्वी आरोग्य मंत्री दिपक सावंत यांचेशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधून राज्यात सुरू असलेल्या लसिकरण मोहिमेचा आढावा घेतला होता. या वेळी राज्यात या मोहिमेअंतर्गत समाधान कारक काम सुरू असल्याबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले.