अधिवेशन संपण्यापूर्वी जलयुक्त शिवार योजनेच्या कामांसाठी नवीन दरसूची तयार करणार- प्रा.शिंदे

0
10

नागपूर, दि. 14 : जलयुक्त शिवार योजनेसाठीच्या कामांकरिता हिवाळी अधिवेशन संपण्यापूर्वी नवीन दर सूची जाहीर करण्यात येईल, असे मृद व जलसंधारणमंत्री प्रा. राम शिंदे यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले. राज्यात जलयुक्त शिवार योजनेच्या प्रस्तावित कामांना तीन वर्षापूर्वीची दरसूची लागू केल्याबाबत सदस्य वैभव नाईक यांनी प्रश्नउपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना प्रा. शिंदे म्हणाले की, या योजनेंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यात 238 कामे प्रस्तावित असून त्यापैकी 206कामे पूर्ण झाली आहेत, तर 32 कामे अपूर्ण आहेत. यासाठी आवश्यक तो निधी विशेष निधीच्या माध्यमातून उपलब्ध करुन वेळेत काम पूर्ण करण्याचेसंबधितांना निर्देश देण्यात येतील.
या योजनेंतर्गत सन 2015-16 व 2016-17 या वर्षात 56 हजार 600 टिसीएम पाणीसाठा झाला असून 22 हजार 237 हेक्टर जमीन ओलिताखाली आली आहे.कोकण विभागासाठी सन 2016-17 मध्ये 18.93 कोटी रुपये निधी खर्च करण्यात आला आहे. राज्यभरातील कामांसाठी 6 हजार 144 कोटी कर्न्व्हजन निधीतून देण्यात आले असून 3 हजार 139 कोटी रुपये विशेष निधीतून उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. यामध्ये 57.99 कोटी रुपये कोकणसाठी विशेष निधीतूनदेण्यात आले आहे.
मृद व जलसंधारण विभाग निर्माण केल्यानंतर 2013 ची दरसूचीतात्पूरत्या स्वरुपात लागू केली होती. हे अधिवेशन संपण्यापूर्वी नवीन दरसूची जाहीर करण्यात येईल, असेही प्रा. शिंदे यांनी यावेळी सांगितले.यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य सर्वश्री एकनाथ खडसे,बाळासाहेब थोरात, भास्कर जाधव, सुरेश गोरे, हर्षवर्धन सपकाळ, शंभुराज देसाई यांनी भाग घेतला.