महोत्सवामुळे नागपूरच्या संत्र्याला वैश्विक ओळख- मुख्यमंत्री

0
9

v  पहिल्या जागतिक संत्रा महोत्सवाचे थाटात उद्घाटन

v  संत्रा प्रजातींच्या संशोधनासाठी कृषी विद्यापीठाला कोटींचा निधी

v  नोगाचे पुनरुज्जीवन

 नागपूर, दि. 16 :  ऑरेंज सिटी म्हणून नागपूरची ओळख नेहमीच राहिली आहे. ही ओळख आता जागतिक स्तरावर नेण्यासाठी संत्रा महोत्सव महत्वाचा ठरणार आहे. या महोत्सवाच्या माध्यमातून जगभरातील शास्त्रज्ञ, नागरिक येथे येतील व जागतिक संत्रा महोत्सवामुळे खऱ्या अर्थाने नागपूरच्या संत्र्याला वैश्विक ओळख मिळेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

कविवर्य सुरेश भट सभागृहात आयोजित पहिल्या जागतिक संत्रा महोत्सवाचे उद्घाटन करतांना मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यावेळी मंचावर केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय कृषी राज्यमंत्री गजेंद्रसिंह शेखावत, राज्याचे पर्यटन मंत्री जयकुमार रावल, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, नागपूरच्या महापौर नंदा जिचकार, माजी खासदार विजय दर्डा, बजाज इलेक्ट्रिकल्स लिमिटेडचे कार्यकारी अध्यक्ष अतुल शर्मा, युपीएलचे मुख्य कार्यकारी अधिकारी रज्जुभाई श्रॉफ आदी उपस्थित होते.

संत्रा प्रक्रिया उद्योगात तसेच संत्रा उत्पादनातील वाढीसाठी संशोधनाची गरज आहे, असे सांगून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, झालेले संशोधन शेतकत्यांपर्यंत पोहचले पाहिजे. जोपर्यंत संत्र्यांच्या चांगल्या कलमांचा पुरवठा होणार नाही तोपर्यंत चांगल्या प्रतिची संत्री निर्माण होणार नाहीत. मिहान प्रकल्पात आता चांगल्या आणि दुय्यम संत्र्यालासुध्दा पतंजली उद्योग समुहाकडून खरेदी करण्यात येईल. त्यांच्या क्षमतेनुसार संत्रा पुरविणे हे आपल्यासमोर एक आव्हान आहे. प्रक्रिया उद्योग झाले तरच शेतमालाला भाव मिळेल आणि प्रक्रिया उद्योगामुळे शेतकयांना शाश्वत बाजारपेठ उपलब्ध होईल. नागपूर ऑरेंज ग्रोव्हर असोसिएशनच्या (नोगा) उत्पादनाचे पुनरुज्जीवन करण्यात येईल. त्यामुळे संत्रा उत्पादक शेतकत्यांच्या हातात बाजारपेठ येईल. जागतिक संत्रा महोत्सवाच्या माध्यमातून विविध तंत्रज्ञान आणि विविध संत्राच्या प्रजाती पाहायला मिळेल.

विदर्भात ड्रायपोर्ट आणि नागपूर-मुंबई समृध्दी महामार्गाच्या माध्यमातून कोल्ड स्टोरेजची आणि वाहतुकीची व्यवस्था निर्माण होणार आहे. त्याचा फायदा शेतकऱ्यांना होईल. या महोत्सवासाठी लोकमत समुह आणि राज्याच्या पर्यटन विभागाने महत्वाची भुमिका पार पाडली आहे, याचा त्यांनी उल्लेख केला. संत्राच्या विविध कलमा तयार करून संत्रा विकासासाठी अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाला दोन कोटी रुपयांचा अधिक निधी देण्यात येईल. तीन दिवसीय संत्रा महोत्सवात मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी सहभाग घेऊन येथे होणाऱ्या मार्गदर्शनाचा उपयोग करावा. संत्रा महोत्सव दरवर्षी आयोजित केला जावा. यासाठी शासन सर्व सहकार्य करेल, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

केंद्रीय नितीन गडकरी म्हणाले, नागपूरी संत्र्यामध्ये आंबट, गोड आणि कडवट चवीचे मिश्रण आहे. संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. संत्र्याच्या विविध जातींचा विकास करणे आणि त्याचे उत्पादन वाढविणे गरजेचे आहे. सुरुवातीच्या काळात वरुड, मोर्शी येथील नर्सरी प्रसिद्ध होत्या. त्याला पुन्हा संजीवनी देण्यासाठी राज्याच्या कृषी विभागाने याकडे गांभिर्याने लक्ष द्यावे. संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचा विकास करण्यासाठी संत्र्याच्या विविध प्रजातींच्या कलमा उपलब्ध करून देणे पहिली आवश्यकता आहे. ज्याप्रमाणे मदर डेअरीमुळे विदर्भातील दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला तसाच दिलासा संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे. देशातील विविध विमानतळावर संत्रा, द्राक्षे, सफरचंद विक्रिसाठी उपलब्ध करून देण्याचा विचार आहे. सोबतच राज्य शासनाच्या महाऑरेंजच्या माध्यमातून रेल्वे स्टेशनवरसुद्धा या फळांची विक्री व्हावी. तसेच संत्र्याची मार्केटिंग करणाऱ्या कंपन्यांचेसुद्धा या महोत्सवात एक चर्चासत्र आयोजित करावे. हा महोत्सव शेतकऱ्यांना एक नवी दिशा देईल, असा विश्वास ना. गडकरी यांनी व्यक्त केला.याप्रसंगी पर्यटन मंत्री जयकुमार रावल ,रज्जुभाई श्रॉफ आणि अतुल शर्मा यांनीही मनोगत व्यक्त केले.संत्रा महोत्सवात श्रीलंका, भुतान, इस्त्रायल, टर्की यासह अन्य देशातील संत्र्यांच्या स्टॉलचा समावेश आहे. तत्पूर्वी मान्यवरांच्या हस्ते फित कापून पहिल्या जागतिक संत्रा महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. दीप प्रज्वलनानंतर संत्रा लोगोचे मान्यवरांनी अनावरण केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विजय दर्डा यांनी केले तर आभार खासदार अजय संचेती यांनी मानले. यावेळी लोकप्रतिनिधी, विविध वरिष्ठ शासकीय अधिकारी, संत्रा उत्पादक शेतकरी व नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.