ज्येष्ठ नागरिकांसाठी लवकरच सर्वसमावेशक धोरण तयार करणार – राजकुमार बडोले

0
20

नागपूर,दि.21 – अन्य राज्यांमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेल्या धोरणाचा अभ्यास करुन राज्याचे सर्वसमावेशक धोरण तयार करण्यात येईल, अशी माहिती सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी विधानसभेत लक्षवेधीच्या सूचनेच्या उत्तरात दिली.आ. मंगलप्रभात लोढा यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. या लक्षवेधीवर बोलताना बडोले म्हणाले की, ज्येष्ठ नागरिक धोरण 30 सप्टेंबर 2013 रोजी करण्यात आले. या धोरणाच्या माध्यमातून गंभीर आजाराबाबत धर्मदाय संस्था व राज्य शासनाकडून मदत करण्यात येते. तसेच शासकीय रुग्णालय व बस प्रवासाकरिता सवलत देण्यात येते. अन्य राज्यातील धोरणाचा अभ्यास करुन राज्याचे सुधारीत सर्वसमावेशक धोरण तयार करण्याकरिता या धोरणासाठी ज्येष्ठ नागरिकांचे प्रतिनिधी व इतर संबंधीत घटकांची समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीचा अहवाल प्राप्त झाल्यावर लवकरच सर्वसमावेशक ज्येष्ठ नागरिक धोरण जाहीर करण्यात येणार आहे. केंद्राप्रमाणे राज्यातही ज्येष्ठ नागरिकांना विविध सवलती देण्यात याव्यात तसेच ज्येष्ठ नागरिकांचे वय 65 वरुन 60 करण्यात यावे याबाबत शासन सकारात्मक असल्याचे बडोले यांनी सांगितले. ज्येष्ठ नागरिकांच्या मानधनामध्ये वाढ करण्याबाबत कार्यवाही चालू असून सर्व जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. विधवा व दिव्यांग महिला यांचा मुलगा 25 वर्षाचा झाला असेल तर त्याची पेन्शन बंद केली जाईल. संजय गांधी निराधार योजनेचे पैसे तसेच ज्येष्ठ नागरिकांचे वर्षभर मानधन थकीत असेल तर संबंधित तहसिलदारावर कार्यवाही केली जाईल. संलग्न खाते असलेल्या लाभार्थ्यांना 1200 रुपये दिले जाणार आहेत. या चर्चेत आ. चंद्रदीप नरके, आ. विजय काळे, आ. हसन मुश्रीफ, आ.अब्दुल सत्तार, आ. समीर कुणावार, आ. विजय वडेट्टिवार, आ. जयंत पाटील, आ. अतुल भातखळकर, आ. श्रीमती मनिषा चौधरी, आ. भारती लव्हेकर आदींनी सहभाग घेतला होता.