विधान परिषदेचे माजी सभापती ना. स. फरांदे यांचे निधन

0
13

पुणे,दि.16 – विधान परिषदेचे माजी सभापती  ना. स. फरांदे यांचे निधन झाले आहे. वयाच्या 78 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. घरातील बाथरूममध्ये पाय घसरून पडल्याने त्यांच्या मेंदूतून रक्तस्राव सुरू झाला होता. यामुळे त्यांना पुण्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, तीन मुली असा परिवार आहे.मूळचे सातारा जिल्ह्यातील अोझरडे येथील असलेले फरांदे यांचे उच्च शिक्षण सोलापूर येथे झाले. सुरूवातीला त्यांनी धुळे व नंतर नगर जिल्हयातील कोपरगाव येथे प्राध्यापक म्हणून नोकरी केली. कोपरगावला प्राध्यापक असताना ते राजकारणात आले. नगर जिल्हा भाजपाचे ते अध्यक्ष होते. नंतर त्यांनी भाजपाच्या प्रदेशाध्यक्षपदाचीही सूत्रं सांभाळली. नाशिक पदवीधर मतदारसंघातून ते दोन वेळा विधानपरिषदेवर निवडून गेले. विधान परिषदेचे उपसभापती व सभापती ही दोन्ही पदे त्यांनी भूषविली. त्यांनी नगरमधून लोकसभा निवडणूकही लढवली होती. पण त्यात अपयश आले.