राज्य सहकारी संघाची निवडणूक उधळली

0
5

पुणे,दि.20(विशेष प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य सहकारी संघाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी पुरस्कृत सदस्य आणि भारतीय जनता पक्ष पुरस्कृत उमेदवारांत सोमवारी राडा झाला. यात भाजपा पुरस्कृत सदस्यांनी मतदानपेटी आणि टेबल खुर्च्या भिरकावून दिल्याने एकच गोंधळ झाला. या गोंधळामुळे अध्यक्षपदाची निवडणूक स्थगित करण्यात आली.
सहकार जगताचे लक्ष वेधलेल्या महाराष्ट्र राज्य सहकारी संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीत भारतीय जनता पार्टीप्रणीत सहकार पॅनलचा धुव्वा उडवीत राष्ट्रवादी काँंग्रेस आणि काँग्रेसप्रणीत परिवर्तन पॅनलने सहकारावरील निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले होते. भाजपाचे आमदार प्रवीण दरेकर यांच्या सहकार पॅनलला आघाडीच्या संजीव कुसाळकर यांच्या परिवर्तन पॅनलने पराभूत केले. सोमवारी संघाच्या अध्यक्षपद, उपाध्यक्ष व सचिवपदासाठी मतदान होते. त्यासाठी नवनिर्वाचित २१ सदस्य आले होते. त्यातील १० सदस्य भाजपा पुरस्कृत पॅनेलच्या बाजूने होते. तर ११ सदस्यांचा आघाडी पुरस्कृत कुसाळकर पॅनलला पाठिंबा आहे.
पुणे स्टेशन येथील राज्य सहकारी संघाच्या सभागृहात सकाळी ११ वाजता मतदानाची प्रक्रिया सुरू झाली. मतदानाची कार्यक्रमपत्रिका मिळाली नसल्याचे कारण सांगत भाजपा पुरस्कृत सदस्यांनी मतदान कक्षातील टेबल-खुर्च्या भिरकावून देत गोंधळास सुरुवात केली. याचा व्हिडीओ प्रसारित झाला असून, त्यात भाजपा पुरस्कृत पॅनलचे भिकाजी पार्ले टेबल उधळून देताना दिसत आहेत.
या घटनेनंतर परिवर्तन पॅनलच्या ११ संचालकांनी काँग्रेसभवन येथे पत्रकार परिषद घेतली. विद्या पाटील म्हणाल्या, प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांनी आमच्या पॅनलमधील सदस्यांवर दबाव आणायचा प्रयत्न केला. मतदानासाठी मुख्यमंत्र्यांशी बोला, असे ते फोन घेऊन सांगत होते.

घटनेचा अहवाल राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाला दिला जाणार आहे. याबाबत पोलिसांत तक्रार दाखल झालेली नाही. सहकार निवडणूक आयुक्त यांच्या निर्णयानुसार कार्यवाही केली जाईल. -आनंद कटके, जिल्हा उपनिबंधक