गडकरींच्या पुढाकाराने स्थापन गृहनिर्माण प्रकल्पात घोटाळे

0
7

मुंबई – कायद्याचे उल्लंघन करून कामगारांकडून लाखो रुपये उकळून निकृष्ट घरे देण्याचे प्रकरण नागपूरच्या बुटीबोरी औद्योगिक वसाहतीत उघडकीस आले आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पुढाकाराने स्थापन झालेल्या इंडोरामा कामगार सहकारी गृहनिर्माण संस्थेने हा भ्रष्टाचार केल्याचा आरोप एका सामाजिक कार्यकर्ते जम्मू आनंद यांनी केला आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही या कामगार संघटनेचे विद्यमान असून त्यांच्याच पत्रावरून गृहनिर्माण प्रकल्पासाठीचे भूखंड मिळाल्याचा आनंद यांचा दावा आहे. दरम्यान, आगामी अर्थसंकल्पी अधिवेशनात हा विषय गाजण्याची चिन्हे असल्याने फडणवीस यांनी नागपूर विभागीय आयुक्तांना तातडीने चौकशीचे आदेश दिले आहेत.

वीर सावरकरनगर या नावाने उभारण्यात आलेल्या या प्रकल्पातील आणि २०१३ मध्ये ताबा मिळालेली ही घरे सहा महिन्यांत गळू लागल्याने शेकडो कामगारांचा जीव टांगणीला लागलेला आहे. या प्रकल्पासंबंधित आरोपांची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे.

या गृहनिर्माण संस्थेने सादर केलेल्या नकाशाप्रमाणे नाही, असे स्पष्ट करत ‘एमआयडीसी’ने या प्रकल्पास बांधकाम पूर्णतेचे प्रमाणपत्र देण्यास नकार दिला आहे. त्यातच बहुतांश कामगारांकडून संस्थेने नोंदणीचे पैसे घेऊनही नोंदणी न केल्याने हे कामगार अजूनही कायदेशीरदृष्ट्या घराचे मालक होऊ शकलेले नाहीत. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, प्रकल्पाच्या सुरुवातीला संस्थेने जाहिरातीत जाहीर केलेल्या किमतीच्या चौपट रक्कम या कामगारांनी आतापर्यंत अदा केली आहे.

विशेष म्हणजे या संस्थेचे प्रवर्तक आणि इतर पदाधिकारी हे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कामगार संघटनेचे पदाधिकारी असून या गृहनिर्माण संस्थेसाठी भूखंड मिळवण्यापासून उभारणीबाबतचा पाठपुरावा खुद्द गडकरींनी संबंधित प्राधिकरणांकडे केल्याचा आरोप आनंद यांनी केला आहे.