काळ्या धनाच्या प्रस्तावावर मोदी सरकारला राज्यसभेत झटका

0
19

नवी दिल्ली – फर्डे वक्ते असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या तासाभरापेक्षा अधिक वेळ झालेल्या भाषणानंतर राज्यसभेत सरकारला एका प्रस्तावावर झटका बसला आहे. राष्ट्रपतींच्या अभिभाषणातील एका मुद्यावर झालेल्या मतविभाजनात सरकार पराभूत झाले आणि त्यांना माघार घ्यावी लागली आहे.अर्थसंकल्पीय अधिवेशनाआधी झालेल्या राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेला मंगळवारी पंतप्रधानांनी उत्तर दिले. त्यानंतर अभिभाषणाचा धन्यवाद प्रस्ताव पारित होण्याआधी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राज्यसभा सदस्य सीताराम येचुरी यांनी एका प्रस्तावावर आक्षेप घेतला आणि त्यावर मतविभाजन झाले. त्यात येचुरींच्या प्रस्तावाच्या बाजूने 118 तर सरकारच्या बाजूने 57 मते पडली. यामुळे सरकारला आता अभिभाषणात संशोधन करावे लागणार आहे.
राज्यसभेची परंपरा राहिली आहे, की पंतप्रधानांच्या भाषणानंतर विरोधीपक्ष त्यांना प्रश्न विचारू शकतात. लोकसभेत हा नियम नाही. मात्र आज जेव्हा राज्यसभेत विरोधीपक्षांचा हा अधिकार डावलण्यात आला तेव्हा सीपीएम नेते सीताराम येचूरी त्यांच्या प्रस्तावावर अडून राहिले.
त्यांचा प्रस्ताव होता, की राष्ट्रपतींच्या अभिभाषणात हे देखील जोडले पाहिजे, की सरकार काळेधन परत आणण्यात अपयशी ठरली आहे. येचूरींनी यावर नियमांतर्गत मतविभाजनाची मागणी केली, ती स्विकारण्यात आली. व्यंकय्या नायडूंनी याला विरोध केला होता. कारण त्यांना माहित होते, की राज्यसभेत सरकार अल्पमतात आहे. इलेक्ट्रॉनिक मशीनने मतदान करण्यात आले त्यात सरकारच्या बाजूने 57 तर विरोधात 118 मते पडली.
सरकारचे अपयश
पंतप्रधान मोदींनी अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना विरोधकांचे अनेक मुद्दे खोडून काढण्याचा प्रयत्न केला. मात्र सरकार सर्वपक्षीय सहमती मिळवण्यात अपयशी राहिले. भाषण झाल्यानंतर पंतप्रधान मोदी लागलीच सभागृहाबाहेर निघून गेले. त्यामुळे प्रस्तावावर सहमती मिळवण्यासाठी त्यांच्या मंत्रिमंडळातील सदस्यांना धावपळ करावी लागली, परंतू विरोधकांचा रोष ओढवून घेतलेल्या सरकारच्या मंत्र्यांना ते शक्य झाले नाही.

विशेष म्हणजे, राज्यसभेत एनडीए सरकारची सदस्य संख्या 72 आहे. मात्र बहुते सदस्य सभागृहात उपस्थित नव्हते.