जिल्हाधिकाऱ्यांच्या समितीनेही ठेवला ठपका

0
16

बीड : जिल्हा परिषदेतील बेकायदेशीर कामांच्या तक्रारीनंतर सुरु असलेले लेखापरीक्षण पूर्ण होतही नाही, तोच तत्कालीन (कॅफो) मुख्य वित्त व लेखा अधिकारी वसंत जाधवर यांचे ‘डबलबिल’ प्रकरण बाहेर आले. मंगळवारी रात्री जाधवर यांच्यासह मजूर संस्थेच्या अध्यक्षाविरुद्ध शहर ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला.

चिंचोली माळी (ता. केज) येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीच्या दुरुस्तीचे दुबार बिल काढून जिल्हा परिषदेची दोन लाख ८६ हजार ६६० रुपयांची फसवणूक करुन अपहार केल्याची फिर्याद बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता एस. आर. शेंडे यांनी दिली. त्यावरुन तत्कालीन कॅफो जाधवर व अध्यक्ष संत ज्ञानेश्वर मजूर सहकारी संस्था, कासारी बोडखा ता. धारुर या दोघांविरुद्ध गुन्हा नोंद झाला. या फिर्यादीने जि.प. च्या अधिकारी- कर्मचाऱ्यांत एकच खळबळ उडाली आहे. ३ आॅक्टोबर ते २९ नोव्हेंबर २०१४ या दरम्यान तत्कालीन कॅफो वसंत जाधवर यांनी चिंचोलीमाळी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारत दुरुस्तीचे दोन देयके आदा केली होती. हे धक्कादायक प्रकरण बाहेर आल्यानंतर सीईओ नामदेव ननावरे यांनी कॅफो जाधवर यांच्यासह संबंधित संस्थेविरुद्ध गुन्हा नोंदविण्याचे आदेश दिले होते. विशेष म्हणजे ज्या दिवशी जाधवरांना कार्यमुक्त केले, त्याच दिवशी त्यांनी बनावट देयक अदा केले. सहायक निरीक्षक मारूती शेळके म्हणाले, कागदपत्रे हस्तगत करून तपास सुरू केला आहे.

नंदूरबार येथून दोन वर्षांपूर्वी बीडला बदलीने आलेले कॅफो वसंत जाधवर यांचा कार्यकाळ वादग्रस्त होता. नंदूरबारमधील कार‘किर्र्दी’मध्ये केलेल्या कारनाम्यांमुळे त्यांच्यामागे चौकशीचा ससेमिरा सुरुच होता. बीडमध्येही पदाधिकारी- कर्मचाऱ्यांशी त्यांचे नेहमी खटके उडत. सतत ‘कायद्या’ची भाषा बोलणारे जाधवर फायद्याच्या नादातच कचाट्यात सापडले. २९ नोव्हेंबर २०१४ रोजी त्यांच्यावर एकतर्फी कार्यमुक्तीची नामुष्की ओढावली होती. आता ते पोलिसी चौकशीच्या फेऱ्यात आडकले आहेत.

जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या पथकाने केलेल्या चौकशीत तत्कालीन कॅफो जाधवर यांच्यावर ठपका आहे. वित्त आयोग, झेडपीआर, दलित वस्ती विकास योजनेच्या कामांमध्ये तरतूदीपेक्षा अधिक रुपयांची देयके मंजूर करणे, वित्तीय अनियमितता करणे, रेकॉर्ड न ठेवणे असे गंभीर आरोप करण्यात आले आहेत.