मराठीला अभिजात नव्हे, बहुजात भाषेचा दर्जा द्या-जैमिनी कडू

0
12

जालना : मराठीला अभिजात मराठी भाषेचा दर्जा द्यावा, अशी मागणी करणारी शिफारस राज्य शासनाने केंद्राकडे केली आहे. परंतु अभिजात हा शब्द केवळ उच्चवर्णीयांमध्ये वापरला जाणारा आहे. राज्यात बहुजन समाज मोठ्या संख्येने असल्याने अभिजात ऐवजी बहुजात मराठी भाषेचा दर्जा मिळावा, अशी मागणी प्रसिद्ध विचारवंत प्रा. जैमिनी कडू यांनी केली. या मागणीसाठी बहुजन समाजाने अग्रेसर व्हावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

येथील कृष्णराव फुलंब्रीकर नाट्यगृहात पहिले राज्यस्तरीय सत्यशोधिका मुक्ता साळवे साहित्य संमेलनाच्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी पुणे येथील विचारवंत रमेश राक्षे होते. स्वागताध्यक्ष म्हणून डेव्हीड घुमारे, सीटू संघटनेचे अध्यक्ष अण्णा सावंत, महात्मा फुले समता परिषदेचे मराठवाडा संघटक साहेबराव खरात, दलितमित्र उत्तमराव बैसने, चंद्रकांत वानखेडे, अ.भा. सत्यशोधक समाजाचे अध्यक्ष डॉ. अशोक चोपडे, दिनकर घेवंदे, ज्येष्ठ समाजसेवक आर.डी. खंदारे, राजाभाऊ देशमुख आदींची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.

कडू पुढे म्हणाले की, संस्कृतमध्ये अभिजात म्हणजे ब्राह्मण. त्यामुळे केवळ साडेतीन टक्के लोकांसाठीच अभिजात या शब्दाचा आग्रह का? असा सवाल त्यांनी केला. संस्कृत भाषेच्या एका विद्यापिठासाठी राज्य सरकार दरवर्षी ४० कोटींचा निधी खर्च करते. तेव्हा लोकभाषांसाठीही स्वतंत्र विद्यापीठ असायला हवे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

केंद्रात आणि राज्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारांचे सरकार आले आहे. रा.स्व. संघाचे विचार विषारी असल्याचा आरोप करून कडू म्हणाले, राज्यात नरेंद्र दाभोळकर, गोविंद पानसरे यांचे मारेकरी सरकारला सापडत नाहीत, हे दुर्दैव असल्याची टिकाही कडू यांनी केली.

राज्यात पुरोगामी चळवळ, सत्यशोधक चळवळ आज अपयशी असल्याचे कारण या मानसिकतेच्या विचारांची व्होट बँक नाही, असेही कडू म्हणाले.

स्वागताध्यक्ष घुमारे म्हणाले, मुक्ता साळवे यांनी वयाच्या १४ व्या वर्षी आपल्या निबंधातून धर्मचिकित्सा केली. खरे तरे हे साहित्य लोकांसमोर येऊ दिले गेले पाहिजे होते. मात्र ते आले नाही, अशी खंत व्यक्त केली. उपेक्षित समाजाने प्रत्येक क्षेत्रात श्रेष्ठत्व सिद्ध करावे, अशीच व्यवस्था वेळोवेळी निर्माण केली जात असल्याचे ते म्हणाले.आपल्या अध्यक्षीय भाषणातून राक्षे यांनी मुक्ता साळवे साहित्य संमेलन प्रथमच होत असल्याबद्दल समाधान व्यक्त करून अशा साहित्य संमेलनाची राज्यात सर्वत्र गरज असल्याचे प्रतिपादन केले. वानखेडे यांनी हे संमेलन म्हणजे महाराष्ट्रासाठी मोठी देणगी असल्याचे सांगितले.

यावेळी प्रा.डॉ. रावसाहेब ढवळे, सुधाकर निकाळजे, संयोजक राजेंद्र घुले, अशोक घोडे, संतोष गाजरे, अ‍ॅड. बी.एम. साळवे, मधुकर मोकळे, किशोर घोरपडे, वसंत साळवे, रोहिदास गंगातिवरे, राम गायकवाड, पी.के. आर्सुड, लहाने, प्रशांत आढाव, प्रमोद खरात आदींची उपस्थिती होती