अवकाळी पावसाची नाशिक व धुळे जिल्ह्यात हजेरी

0
17

नाशिक – आज सकाळपासून अवकाळी पावसाने नाशिक आणि धुळे जिल्ह्यात हजेरी लावली असून अनेक ठिकाणी गारपीटही झाली.
चोहोबाजूंनी संकटात सापडलेल्या बळीराजाच्या डोळ्यात आसवे आणण्याचा निसर्गकोप अव्याहतपणे सुरू आहे. आज नाशिकसह चांदवड, सिन्नर, दिंडोरी, निफाड या तालुक्यांना गारपिटीचा तडाखा बसला. तसेच धुळे जिल्ह्यातही अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. त्यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी गारपीटही झाली आहे.

नाशिक जिल्ह्यात काल दिवसभर ढगाळ वातावरण होते. काल दुपारपासून रात्री उशिरापर्यत आणि आज सकाळी दिंडोरी, निफाड, चांदवड, सिन्नर, नाशिक तालुक्यात पावसाने हजेरी लावली. त्यामुळे द्राक्ष, गहू पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. दिंडोरीत ओझे, म्हेळूस्के, करंजवण, ननाशी या परिसराला गारपिटीने झोडपले. रस्त्यांवर गारांचा मोठा खच पडलेला होता. बाडगीचापाडा, देवघर, वणीखूर्द, कवडाशर, चिकाडी, गांडोळे आदी भागात गेल्या दोन दिवसांपासून पावसाने हजेरी लावत शेतकर्‍यांच्या भातशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे.