पुलवामा दहशतवादी हल्ल्यातील शहिदांच्या कुटुंबांना 50 लाखांची मदत-मुख्यमंत्री

0
10

मुंबई, दि. 16: जम्मू-काश्मिरमधील पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या महाराष्ट्रातील दोन जवानांच्या कुटुंबांना प्रत्येकी 50 लाख रूपयांची मदत देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. या दोन्ही कुटुंबांच्या पुनर्वसनाची जबाबदारीही राज्य शासनातर्फे उचलण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.तासगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचे अश्वारूढ पूर्णाकृती शिल्प व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पूर्णाकृती शिल्प यांचे अनावरण व लोकार्पण सोहळा आणि सामाजिक अधिकारिता शिबिरांतर्गत दिव्यांगांना सहाय्यक उपकरण वाटप कार्यक्रमप्रसंगी मुख्यमंत्री बोलत होते.

पुलवामा येथे केंद्रीय राखीव पोलीस दलावर झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याच्या घटनेने संपूर्ण देश आज उद्विग्न असून सर्वांच्या मनात प्रचंड राग आहे. पाकिस्तान आगळीक करत असून त्यांना त्यांची जागा दाखवून देणे आवश्यक आहे. अशा घटनांना जशास तसे प्रत्युत्तर दिले जाईल असे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटले असल्याची आठवणही त्यांनी यावेळी करुन दिली. या हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध नोंदवून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, जवानांचे बलिदान व्यर्थ जाऊ दिले जाणार नाही. बुलडाणा जिल्ह्यातील संजय राजपूत आणि नितीन राठोड हे दोन जवान या हल्ल्यात शहीद झाले आहेत. या शहीद जवानांच्या कुटुंबीयांसोबत संपूर्ण देश असून त्यांच्या कुटुंबांचे संपूर्ण पुनर्वसन शासनामार्फत केले जाईल. तसेच त्यांना 50 लाखांची मदत दिली जाईल, अशी घोषणाही त्यांनी केली आहे.